एकाच दुकानाची दुसऱ्यांदा विक्री : मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 01:17 AM2020-07-14T01:17:43+5:302020-07-14T01:20:17+5:30
एकाच दुकानाची दोन वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री करून फसवणूक करणाऱ्या मायलेकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाच दुकानाची दोन वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री करून फसवणूक करणाऱ्या मायलेकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. शारदा रोहित चौबे (वय ५२) आणि अमित रोहित चौबे (वय ३०) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी राकेश भीमसेन तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तिवारी यांना गॅरेज सुरू करण्यासाठी जागेची आवश्यकता होती. आरोपी चौबे यांचे हिंगणा मार्गावर राजीवनगर बसथांब्यासमोर दुकानाचे गाळे विकायचे आहे, अशी माहिती तिवारी यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी चौबे मायलेकाशी संपर्क केला. १५ लाख २५ हजार रुपयात दुकानाचा सौदा केल्यानंतर त्यांना पाच लाख रुपये दिले. उर्वरित रक्कम दुकानाचे विक्रीपत्र करण्याच्या दिवशी देण्याचे ठरले. ५ ऑगस्ट २०१८ ते २९ जानेवारी २०२० या कालावधीत दुकानाची विक्री झालीच नाही. दरम्यानच्या कालावधीत हे दुकान चौबे मायलेकाने दुसऱ्याच एका व्यक्तीला १२ लाख ५० हजार रुपयात विकल्याचे समजले. त्यामुळे तिवारी यांनी आपली रक्कम परत मागितली. मात्र आरोपींनी ही रक्कम परत दिली नाही. त्यामुळे तिवारींनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणात सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.