बहुचर्चित गँगरेप प्रकरणात एसआयटीकडून दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल
By नरेश डोंगरे | Published: September 2, 2022 10:03 PM2022-09-02T22:03:10+5:302022-09-02T22:03:28+5:30
३० जुलै ते १ ऑगस्ट असे सतत तीन दिवस पीडित महिला तीन नराधमांच्या वासनेची शिकार झाली होती
नरेश डोंगरे
नागपूर - राज्यभर संतापाची लाट निर्माण करणाऱ्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील बहुचर्चित सामुहिक बलात्कार प्रकरणाला बुधवारी कलाटणी मिळाली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने (विशेष तपास पथक) कारधा (जि. भंडारा) पोलीस ठाण्यात दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, नव्याने दाखल झालेल्या या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
३० जुलै ते १ ऑगस्ट असे सतत तीन दिवस पीडित महिला तीन नराधमांच्या वासनेची शिकार झाली होती. पहिल्या आरोपीने तिचे कारमधून अपहरण केले आणि वेगवेगळ्या दोन ठिकाणी तिच्यावर बलात्कार करून तो पळून गेला. तर, दुसऱ्या वेळी आरोपी लुक्का उर्फ अमित आणि मोहम्मद एजाज या दोघांनी तिच्यावर पाशवी अत्याचार करून तिला जबर जखमी अवस्थेत कारधा (जि. भंडारा) पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडून पळ काढला. २ ऑगस्टला या घटनेचा बोभाटा झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. विविध राजकीय पक्ष अन् राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची नेमणूक केली. त्यानुसार आयपीएस अधिकारी रागासुधा आर. यांच्या नेतृत्वात एसआयटीने या प्रकरणाचा तपास केला. त्यानुसार, प्रारंभी भंडारात दाखल झालेल्या सामुहिक बलात्कारात तीन आरोपी (लुक्का, एजाज आणि फरार असलेला अनोळखी) नमूद करून हे प्रकरण गोंदियात वर्ग करण्यात आले. दरम्यान, गेल्या महिनाभराच्या तपासात दोन्ही बलात्काराचे गुन्हे वेगवेगळे (स्वतंत्र) आहेत, यातील पहिल्या व दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपींचा एकमेकांशी संबंध नाही, त्यामुळे एकच गुन्हा दोन्ही ठिकाणी नोंदणे योग्य नाही, असा निष्कर्ष एसआयटीने काढला. त्यानुसार, सरकारतर्फे एक पोलीस अधिकारी या गुन्ह्यात फिर्यादी झाला आणि त्यांच्या तक्रारीवरून बुधवारी पहाटे कारधा पोलीस ठाण्यात सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन्ही खटले स्वतंत्र चालणार
या घडामोडीमुळे आता या प्रकरणात दोन्ही गुन्ह्यांचे आरोपी वेगवेगळे झाले असून, त्यांचा खटलाही वेगवेगळ्या न्यायालयात चालणार आहे. पहिल्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा स्वतंत्र गुन्हा गोंदिया न्यायालयात चालेल तर दुसरा सामुहिक बलात्काराच्या गुन्ह्याचा खटला भंडारा न्यायालयात चालणार आहे.