चार वर्षांत दुसऱ्यांदा ऑटोवाल्यांचा बलात्कारी चेहरा उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 11:42 AM2021-08-03T11:42:04+5:302021-08-03T11:42:27+5:30
Nagpur News रागाच्या भरात अथवा रोजगाराच्या शोधात आलेल्या एकट्या तरुणीला - महिलेला हेरून, मदत करण्याच्या नावाखाली तिची अब्रू लुटणाऱ्या ऑटोचालकांचा किळसवाणा चेहरा चार वर्षांत दुसऱ्यांदा उघड झाला आहे. विशेष म्हणजे, या वृत्तीचे हे ऑटोचालक कुकृत्य करताना आपल्या साथीदारांनाही त्यात सहभागी करून घेतात.
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - रागाच्या भरात अथवा रोजगाराच्या शोधात आलेल्या एकट्या तरुणीला - महिलेला हेरून, मदत करण्याच्या नावाखाली तिची अब्रू लुटणाऱ्या ऑटोचालकांचा किळसवाणा चेहरा चार वर्षांत दुसऱ्यांदा उघड झाला आहे. विशेष म्हणजे, या वृत्तीचे हे ऑटोचालक कुकृत्य करताना आपल्या साथीदारांनाही त्यात सहभागी करून घेतात.
२९ जुलैच्या रात्री घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या संतापजनक घटनेनंतर पुन्हा एकदा हा विषय चर्चेला आला आहे. शहरातील काही भागातील ऑटोचालकांची गुंडगिरी आणि मजनुगिरी नागपूरच नव्हे, तर बाहेरगावच्या नागरिकांसाठीही प्रचंड मनस्तापाचा विषय ठरलेली आहे. कमाल चाैकात काही महिन्यांपूर्वी ऑटोचालकांनी केलेली एका तरुणाची भीषण हत्या आणि तत्पूर्वी हप्ता वसुलीतून सीताबर्डीतील एका ऑटोचालकाची दुसऱ्या ऑटोचालकांनी हिंगणा भागात केलेली हत्या, त्यांच्या गुंडगिरीचा नमुना ठरली आहे.
सीताबर्डीतील झांशी राणी चाैक, इंटरनिटी मॉल चाैकात चालणारी त्यांची मजनुगिरीही वर्षभर चर्चेत राहते. याच भागातील ऑटोचालकांनी २०१६ - १७ मध्ये कामाच्या शोधात आलेल्या तरुणीला मदतीचा हात देण्याचा भास निर्माण करून हिंगणा एमआयडीसी परिसरात नेऊन तेथे तिच्यावर चाैघांनी बलात्कार केला होता. नंतर छत्तीसगडमधून कामाच्या शोधात आलेल्या एका तरुणीवरही हिंगणा एमआयडीसीत असाच प्रकार घडला होता. आता रागाच्या भरात घरून बाहेर पडलेल्या एका तरुणीवर आधी ऑटोचालकासह चाैघांनी आणि नंतर तासाभरानंतर दुसऱ्या दोन ऑटोचालकांनी तिच्यावर अत्याचार केला. पीडिता एकच असली तरी, तिच्यावर एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आरोपींनी बलात्कार केला आहे. अर्थात बलात्कारी ऑटोचालकांचे बीभत्स चेहरे तीनवेळा उघड झाले आहेत.
पीडिता मेयोत दाखल
तीन तासात दोन वेळा सामूहिक बलात्काराला बळी पडलेली ही युवती मेयोत दाखल आहे. तिच्या हातात पिन टोचली असल्याने ती आधीच वेदनांनी त्रस्त होती. तशात तिला आयुष्यभर सलेल अशी जखम या प्रकारामुळे मिळाली आहे.
वर्षभरात गँगरेपचा चौथा गुन्हा
नागपुरात सामूहिक बलात्काराचा वर्षभरात दाखल झालेला हा चौथा गुन्हा आहे. २९ सप्टेंबर २०१९ ला एका १५ वर्षीय मुलीवर यश मेश्राम, अमित बोलके, अभिनेश देशभ्रतार आणि ऋतिक मोहरले या चाैघांनी सामूहिक अत्याचार केला होता. जरीपटका भागात ही घटना घडली होती. त्यानंतर अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील वादातून सामूहिक बलात्काराचे दोन गुन्हे दाखल झाले होते.
बलात्कारी ऑटोचालकांना कठोर शिक्षा व्हावी
शहरात सेवाभावी वृत्ती जपणारे, सामाजिक कार्य करणारे अनेक ऑटोचालक आहेत. प्रवासी महिला-मुलींना ते आपल्या आई-बहिणीसारखे जपतात. मात्र, अशा प्रकारच्या घटनांमुळे सर्वच्या सर्व ऑटोचालकांकडे प्रवासी संशयाच्या नजरेने बघतात. त्यामुळे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत. शाअ ऑटोचालकांना तातडीने कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी विदर्भ ऑटो रिक्षा चालक संघटनेचे विलास भालेकर यांनी केली आहे.
-------