नोटीसचे उत्तर येताच चंद्रपूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी निलंबित करू
By कमलेश वानखेडे | Published: July 11, 2024 07:10 PM2024-07-11T19:10:11+5:302024-07-11T19:10:43+5:30
Nagpur : आ. अभिजित वंजारी यांच्या प्रश्नावर शिक्षणमंत्री केसरकर यांचे आश्वासन
नागपूर : चंद्रपूर येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी विभागात अनेक गैरव्यवहार केले असून त्यांना निलंबित करण्याची मागणी आ. ॲड. अभिजित वंजारी यांनी गुरुवारी विधान परिषदेत लावून धरली. यावर संबंधित शिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून सात दिवसात त्यावर उत्तर येताच निलंबनाची कारवाई करू, असे आश्वासन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
आ. वंजारी म्हणाले, शिक्षणाधिकारी यांच्याकडे वैद्यकीय प्रतिपुर्तीसह विविध प्रस्ताव प्रलंबित असतानाही त्यांनी आपल्याकडे कुठलाही प्रस्ताव प्रलंबित नसल्याचे सांगून शासनाची दिशाभूल केली. प्राथमिकक अहवालात स्पष्टपणे तसा उल्लेख आहे. यासह त्यांच्या गैरव्यवहाराची इतरही प्रकरणे आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी आ. वंजारी यांनी केली. यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांना नोटीस दिली आहे. त्याचा अहवाल एक आठवड्यात प्राप्त करून दिला जाईल. त्यांचे उत्तर प्राप्त झाल्यावर तत्काळ निलंबित केले जाईल, असे आश्वासन केसरकर यांनी दिले.