अमरावती जिल्ह्याचे सालबर्डीच्या अतिप्राचीन ‘रॉक पेंटिंग’चे रहस्य अंधारातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 11:00 PM2020-07-08T23:00:00+5:302020-07-08T23:00:02+5:30
महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात असलेले सालबर्डी हे स्थळ धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले अमरावती जिल्ह्याचे सालबर्डी या ठिकाणचे पुरातत्त्व महत्त्व मात्र दुर्लक्षित राहिले आहे. या परिसरात अनेक विशालकाय खडकांच्या रांगा असून त्यावर पाषाणयुगीन चित्रकारी कोरलेली आढळून आली आहे. ही चित्रकारी आदिम संस्कृतीचे दर्शन घडविणारी आणि इ.स.पूर्व २५,००० ते ५,००० यादरम्यानचे मानवी अस्तित्वाचा इतिहास उलगडणारी ठरू शकते, असा अंदाज ‘रॉक आर्ट’ अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. मात्र पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे हे रहस्य अंधारात असून ते नामशेष होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र-मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात असलेले सालबर्डी हे स्थळ धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. प्राचीन शिवमंदिर दर्शन व शिवगुफा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविकांची गर्दी सालबर्डीत होत असते. शिवाय टायगर कॉरिडोर म्हणूनही या क्षेत्राची ओळख आहे. मात्र यापेक्षा या परिसराच्या पुरातत्त्व वैशिष्ट्याकडे अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे. पुरातत्त्व अभ्यासक अनिर्बान गांगुली व त्यांच्या सहकाऱ्यांनी या रॉक शेल्टरवरील चित्रकारी प्रकाशात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. अनिर्बान यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात जवळपास २५० ते ३०० शैलगृहे आणि मोठ्या गुफा आहेत. पुरातत्त्व विभागाच्या नजरेखाली असले तरी ते दुर्लक्षित आहेत आणि असुरक्षितही आहेत. यातील बहुतेक शिळांवर चित्रकारी केलेली आहे, जी आदिम संस्कृतीचे दर्शन घडविते.
ही चित्रकारी धातू युगातील असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. याशिवाय चिमूर तालुक्याच्या डोंगरगाव परिसरातही अशीच १० ते १५ शैलगृहे आहेत. यातील काहींवर गोंडराजाच्या राजवटीतील आणि काही त्यापूर्वीची असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या शैलगृहांचा सखोल अभ्यास केल्यास या भागातील मानवी अस्तित्वाचे रहस्य उलगडण्यास मदत मिळू शकते. शिवाय रॉक आर्ट आणि पुरातत्त्व अभ्यासकांच्या दृष्टीनेही या क्षेत्राची ओळख निर्माण होऊ शकते. मात्र दरवर्षी पाऊस आणि इतर गोष्टींमुळे ही चित्रकारी मिटत चालली असून, दुर्लक्ष झाल्यास ती लुप्त होण्याची भीती गांगुली यांनी व्यक्त केली.
चित्रात धातू युगातील अवशेष
गांगुली यांनी दिलेल्या माहितीनुसार मगर व इतर प्राण्यांसह मधमाशांचे पोळे, कासव तसेच शस्त्रे आणि धातूची अवजारे असलेल्या मानवी आकृत्या चितारलेल्या आहेत. यावरून ही चित्र लोहयुग किंवा धातू युगातील असण्याची शक्यता असून ई.पूर्व २५००० ते ई.पूर्व १५००० आणि नियोलिथीक युगाचे (१०००० बीसी ते ५००० बीसी) या वर्षादरम्यान मानवी अस्तित्व दर्शविणारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
- भीमबेटकाप्रमाणे मिळावे संरक्षण
मध्य प्रदेशच्या भीमबेटका जगप्रसिद्ध पुरातत्त्व वारसा स्थळ आहे. त्यातही आदिम संस्कृतीच्या अवशेषांची ओळख सांगणारी चित्रकारी आहे आणि एक लाख वर्षापूर्वी मानवी अस्तित्वाच्या खुणा त्यात आहे. मध्य प्रदेश सरकारने या क्षेत्राला संरक्षित केल्याने या क्षेत्राची जागतिक ओळख निर्माण झाली आहे. सालबर्डी व डोंगरगावसारख्या क्षेत्रांनाही याप्रमाणे संरक्षित करण्याची गरज गांगुली यांनी व्यक्त केली.