नागपुरात खर्रा, सिगारेटची ब्लॅकने गुपचूप विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 12:59 AM2020-03-31T00:59:56+5:302020-03-31T01:01:16+5:30
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता बाकी व्यवसाय ठप्प पडले असले तरी सिगारेट, खर्रा, तंबाखूची विक्री मात्र थांबलेली नाही. पोलिसांची गस्त वाढल्याने खुलेआम विक्रीवर आळा बसला असला तरी गुपचूप डिलिव्हरीद्वारे ग्राहकांना त्यांचा माल सहज उपलब्ध होत आहे.
लोकमत न्यूज पेपर
नागपूर : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता बाकी व्यवसाय ठप्प पडले असले तरी सिगारेट, खर्रा, तंबाखूची विक्री मात्र थांबलेली नाही. पोलिसांची गस्त वाढल्याने खुलेआम विक्रीवर आळा बसला असला तरी गुपचूप डिलिव्हरीद्वारे ग्राहकांना त्यांचा माल सहज उपलब्ध होत आहे. विक्रेत्यांनीही वर्क फ्रॉम होम सुरू केले असून ओळखीच्या व नेहमीच्या ग्राहकांसाठी व्यवस्था केली जात आहे.
कोरोनाच्या संसगार्साठी गुटखा किंवा खर्रा धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे लोकमतच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनाने शहरात खर्रा, सिगारेटची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतरही व्यसनाधीन ग्राहकांसाठी खर्रा, सिगारेटची चौका-चौकात सर्रासपणे विक्री सुरू होती. रीतसर दुकाने बंद केल्यामुळे विक्रे त्यांनी घरूनच या पदार्थांची विक्री चालविली आहे. खऱ्र्याच्या पुड्या घरीच तयार करून त्या सिगारेटसह थैलीत घालून चौकात विक्री सुरू होती. एखादा मुलगा चौकात थैली घेऊन बसणे आणि गुपचूप विकणे चालले होते. मात्र गेल्या काही दिवसांत नागपूर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन कठोर पावले उचलत आहे. त्यानुसार पोलिसांचीही गस्त वाढली आहे. त्यामुळे चौकात गुपचूप बसून विक्रीला आळा बसला आहे. आता ओळख असलेल्या व नेहमीच्या ग्राहकांनाच सुविधा पुरविण्यात येत आहे. विक्रेत्यांच्या मोबाईल क्रमांकाची आदानप्रदान करण्यात आली आहे. फोनवर बोलल्यानंतर त्यांना हवा असलेला माल तयार ठेवण्यात येत असल्याचे एका विक्रे त्याने सांगितले.
असे असले तरीही काही ठिकाणी अजूनही खर्रा, सिगारेट विक्री करणाऱ्या मुलांचे टोळके दिसून येतात. चंद्रमणीनगरच्या उद्यानाच्या मागे अशाप्रकारे अनेक तरुण खर्रा खिशात घेऊन तयार असतात व नियमित ग्राहकांना डिलिव्हरी करतात. रामेश्वरीनगर चौक, दिघोरी चौक, म्हाळगीनगर चौक, उत्तर नागपूरचे कमाल चौक, राणी दुर्गावती चौक, जरीपटका चौक आदी परिसरात अशाप्रकारे मादक पदार्थांची विक्री चालत असल्याचे दिसून आले. पोलिसांचे या विक्रेत्यांकडे दुर्लक्ष होत आहे. एकतर आदानप्रदान करताना येणारा संपर्क आणि खऱ्र्याच्या थुंकीतून संसर्गाचा धोका लक्षात घेता अशाप्रकारे खर्रा, सिगारेटच्या गुपचूप विक्रीवरही आळा घालण्याची गरज आहे. पोलीस प्रशासनाने हा धोका गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
ब्लॅकमध्ये किमतीही वाढल्या
बंदमुळे विक्रेत्यांनी खर्रा, सिगारेटच्या किमतीतही वाढ केली आहे. २० ते २५ रुपयांना मिळणारा मजाचा खर्रा ब्लॅकमध्ये ३५ रुपयांपर्यंत आणि १२० चा खर्रा ६० ते ७० रुपयाला विकला जात आहे. सिगारेटच्या किमतीतही आठ ते दहा रुपयांची वाढ झाली आहे.