सिकंदराबाद-दानापूर व्हाया नागपूर ट्रेन आजपासून; प्रवाशांना दिलासा
By नरेश डोंगरे | Published: April 26, 2024 09:02 PM2024-04-26T21:02:28+5:302024-04-26T21:03:42+5:30
उन्हाळ्याची गर्दी : २० अतिरिक्त स्पेशल ट्रेन
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : रेल्वेतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी मध्य रेल्वेने आणखी २० अतिरिक्त उन्हाळी स्पेशल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील सिकंदराबाद-दानापूर ही स्पेशल ट्रेन नागपूरमार्गे धावणार आहे.
उन्हाचा पारा आणि प्रवाशांची गर्दी सारखी वाढत असल्याचे पाहून प्रशासनाने वेगवेगळ्या मार्गावरच्या रेल्वेगाड्या नियंत्रित करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागपूर रेल्वे स्थानकावरून युपी, बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये जास्त गर्दी होत असल्याचे पाहून यापूर्वी नागपूर-गोरखपूर ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. तर आता सिकंदराबाद-दानापूर ही स्पेशल ट्रेन उन्हाळ्यात चालविण्यात येणार आहे. ती नागपूर मार्गे दानापूरला चालविली जाणार आहे. जाण्याच्या १० आणि येण्याच्या १० अशा एकूण २० फेऱ्या ही गाडी लावणार आहे. पहिली फेरी शनिवारी २७ एप्रिलला होणार आहे.
असे राहील वेळापत्रक
ट्रेन नंबर ०७६४७ स्पेशल सिकंदराबाद येथून २७ एप्रिल २०२४ ते २९ जून २०२४ पर्यंत दर शनिवारी रात्री ९ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ७:२५ वाजता ती नागपूरला पोहोचेल. येथून ७:३० ला सुटल्यानंतर सोमवारी पहाटे ५:५० वाजता दानापूरला पोहोचेल.
त्याचप्रमाणे ट्रेन नंबर ०७६४८ दानापूर-नागपूर-सिकंदराबाद ही स्पेशल ट्रेन २९ एप्रिल २०२४ ते १ जुलै २०२४ पर्यंत दर सोमवारी दानापूर येथून सकाळी ८ वाजता सुटेल. ती मंगळवारी सकाळी ८:५५ वाजता नागपूरला पोहोचेल. येथून सकाळी ९:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सिकंदराबादला रात्री ७ वाजता पोहोचेल.
असे राहतील थांबे
या दोन्ही विशेष गाड्यांचे थांबे जानगाव, काझीपेठ, पेड्डापल्ली, रामागुंडम, सिरपूर कागजनगर, बल्लारशाह, नागपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी जंक्शन, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी आणि पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन या स्थानकांवर राहील. या गाड्यांना एक फर्स्ट, दोन टू टायर एसी, सहा थ्री टायर एसी, १० स्लीपर क्लास आणि दोन जनरल सेकंड क्लास कोच राहणार आहेत. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.