नागपूरनजीक सिकंदराबाद-रक्सोल एक्स्प्रेस रुळावरून घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 09:10 PM2020-03-18T21:10:21+5:302020-03-18T21:12:27+5:30
बुटीबोरी ते बोरखेडी दरम्यान सिकंदराबाद-रक्सोल एक्स्प्रेसचा एक कोच रुळाखाली घसरला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु ५ रेल्वेगाड्यांना २ तास विलंब झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुटीबोरी ते बोरखेडी दरम्यान सिकंदराबाद-रक्सोल एक्स्प्रेसचा एक कोच रुळाखाली घसरला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु ५ रेल्वेगाड्यांना २ तास विलंब झाला. ही घटना बुधवारी सकाळी ७.३० वाजता बुटीबोरी रेल्वेस्थानकाजवळ डाऊन लाईनवर सिग्नल परिसरात घडली. यात एस ९ कोचची मागील ३ चाके रुळाखाली घसरली.
बुटीबोरीजवळ सिकंदराबाद-रक्सोल एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सोबतच अॅक्सिडेन्ट रिलीफ ट्रेन बुटीबोरीला पाठविण्यात आली. रुळाखाली घसरलेली कोचची चाके पुन्हा रुळावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. हे काम २६ मिनिटात पूर्ण करण्यात आले. त्यासाठी या गाडीच्या सुरुवातीच्या तीन कोचला इंजिनसोबत नागपूरला पाठविण्यात आले. यातील प्रवाशांना रेल्वेस्थानकावर नाश्ता, चहाची व्यवस्था रेल्वे प्रशासनाने केली. उर्वरित १६ कोच सकाळी ११.५० वाजता नागपूरला पोहोचले. यातील १५०० प्रवाशांसाठी नि:शुल्क भोजन, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. या कामात वाणिज्य कर्मचारी, रेल्वेस्थानकावरील कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी सहकार्य केले. कोरोनासाठी रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या मदतीसाठी डॉक्टरांची चमू तैनात करण्यात आली होती. नागपूरात एस ९ कोचच्या प्रवाशांसाठी अतिरिक्त कोच लावण्यात आला. यात प्रवाशांचे सामान कुलींनी नि:शुल्क कोचमध्ये नेले. त्यानंतर दुपारी १२.२० वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. संपूर्ण घटनाक्रमावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार जातीने लक्ष ठेवून होते.
पाच रेल्वेगाड्यांना विलंब
सिकंदराबाद-रक्सोल एक्स्प्रेसच्या एस ९ कोचची चाके रुळाखाली घसरल्यामुळे पाच रेल्वेगाड्यांना विलंब झाला. यात विदर्भ एक्स्प्रेस, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस, संघमित्रा एक्स्प्रेस आणि अमरावती-अजनी एक्स्प्रेसचा समावेश आहे. या गाड्यांना दीड ते दोन तासांचा विलंब होऊन त्या जागेवरच अडकून पडल्या होत्या.