सुरक्षित नागपूर ही आपली पहिली संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:52 AM2018-08-05T00:52:02+5:302018-08-05T00:54:12+5:30
हे शहर माझे आहे. येथे मी सुरक्षित आहे आणि येथील पोलीस माझे आहेत, ही भावना जनतेमध्ये रुजविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेन. त्यासाठी काही उपक्रमही आपण राबविणार असल्याचे मनोगत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी लोकमतजवळ व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हे शहर माझे आहे. येथे मी सुरक्षित आहे आणि येथील पोलीस माझे आहेत, ही भावना जनतेमध्ये रुजविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेन. त्यासाठी काही उपक्रमही आपण राबविणार असल्याचे मनोगत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी लोकमतजवळ व्यक्त केले.
आतापर्यंत राज्य कारागृह प्रशासनाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे अतिरिक्त पोलीस महासंचालक, डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली आहे. नागपुरात त्यांनी अनेक वर्षे विविध पदांवर काम केले आहे. त्यामुळे नागपुरातील गुन्हेगारी आणि सामाजिक समस्यांची त्यांना चांगली जाण आहे. दांडगा जनसंपर्क असल्यामुळे त्यांचे येथे प्रशस्त नेटवर्क आहे. परिणामी डॉ. उपाध्याय यांची येथे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाल्याचे समजल्यापासून समाजातील विविध घटकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटली आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी डॉ. उपाध्याय यांची लोकमत प्रतिनिधीने भेट घेतली असता त्यांनी नागपूरबाबत आपल्या कल्पनांचा सारांश मांडला. सुरक्षित नागपूर ही आपली पहिली संकल्पना आहे. त्यासाठी गुन्हेगारी नियंत्रण आणि दहशतमुक्त नागपूरकर हा उपक्रम आपण राबविणार आहोत. सर्वच कल्पना सांगणे योग्य होणार नाही. मात्र, हे शहर माझे आहे. येथे मी सुरक्षित आहे आणि येथील पोलीस माझे आहेत, ही भावना जनतेमध्ये रुजविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आपण करू, असे डॉ. उपाध्याय म्हणाले. गुन्हेगारी नियंत्रण करून नागपूरला सुरक्षित शहर बनविण्याचे आव्हान केवळ एकटे पोलीस करू शकणार नाही. त्यासाठी नागरिकांची साथ हवी आहे. पोलिसांबद्दल जोपर्यंत आत्मीयता, आपुलकी वाटणार नाही, तोपर्यंत नागरिक पोलिसांना सहकार्य करणार नाही. त्यासाठी सर्वप्रथम नागपूरकरांची आपल्याला मने जिंकायची आहेत. नागरिकांचा विश्वास जिंकल्यास ते पोलिसांची मदत करणार, अवैध धंदे, गुन्हे आणि गुन्हेगारांची माहिती देणार. त्यांच्या माहितीतूनच गुन्हेगारांना त्यांच्या जागी म्हणजेच, कारागृहात डांबण्याची किमया आम्ही (पोलीस) साधू अन् गुन्हेगार कारागृहात पोहचल्यास किंवा नागपूरबाहेर पळाल्यास नागपूर सुरक्षित शहर बनेल, असा सारांश त्यांनी मांडला.
पुन्हा मिशन मृत्युंजय !
डॉ. उपाध्याय नागपुरात गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त असताना त्यांनी १० वर्षांपूर्वी येथे मिशन मृत्युंजय हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी नागरिकांना आणि खास करून विद्यार्थ्यांना सतर्कतेचे धडे दिले होते. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सतर्कता कशी बाळगायची, कुठे काही संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांची कशी मदत घ्यायची, त्याबाबत मार्गदर्शन, समुपदेशन केले होते. या उपक्रमांतर्गत सुमारे दोन लाख विद्यार्थी आणि नागरिक पोलिसांशी जोडले गेले होते. त्यामुळे या उपक्रमाची राज्यभर प्रशंसा झाली होती. उपाध्याय यांची नंतर येथून बदली झाली अन् हा उपक्रमही बंद पडला. आता नव्या स्वरूपात ‘मिशन मृत्युंजय’सारखा उपक्रम सुरू करायचा आहे, असा मानसही डॉ. उपाध्याय यांनी व्यक्त केला.