महादुला-कोराडीत १६ एटीएमची सुरक्षा रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:07 AM2021-05-15T04:07:45+5:302021-05-15T04:07:45+5:30
दिनकर ठवळे कोराडी : महादुला कोराडी परिसरात असलेल्या १८ एटीएम पैकी १६ एटीएमला सुरक्षारक्षकांची प्रतीक्षाच आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने ...
दिनकर ठवळे
कोराडी : महादुला कोराडी परिसरात असलेल्या १८ एटीएम पैकी १६ एटीएमला सुरक्षारक्षकांची प्रतीक्षाच आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने एटीएमची सुरक्षा धोक्यात असतानाच कोविड संसर्गाच्या काळात एटीएम मध्ये अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या एटीएममध्ये कोविड निर्देशांचे पालन होताना दिसत नाहीत. हेल्मेट घालून, तोंडाला कापड गुंडाळलेली लोक एकाच वेळी एटीएम रूममध्ये प्रवेश करताना दिसतात. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना अनेकाना असुरक्षित वाटते. अलीकडच्या काळात एटीएम फोडण्याच्या घटना लक्षात घेता हे एटीएम किती सुरक्षित आहेत याचाही विचार व्हायला हवा. गणेश नगरीतील युनियन बँकेच्या एटीएम मध्ये काही दिवसापूर्वीच चोरीचा प्रयत्न झाला. तेव्हापासून या बँकेचे एटीएम बंद आहे. या परिसरात एटीएमची संख्या १८ आहे. त्यापैकी गणेश नगरीत असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवर २४ तास ३ पाळीत तीन गार्ड असतात. पांजरा येथील पटेल पेट्रोल पंपवर असलेल्या स्टेट बँकेचे एटीएमवर रात्रपाळीत एक गार्ड असतो. इतर १६ एटीएममध्ये कोणत्याही वेळेला गार्ड राहत नाही. स्टेट बँकेच्या कोराडी कॉलनीत असणाऱ्या एटीएमजवळ रात्रपाळीत गार्ड नसतो. वीज केंद्रात स्टेट बँकेचे एटीएम आहे. कारेमोरे संकुल महादूला येथे अॅक्सिस बँकेचे एटीएम, बालाजी किराणा जवळ बँक ऑफ इंडिया एटीएम, महादूला येथे बँक ऑफ बडोदा एटीएम , महादूला बाजारात इंडसेंट यांचे एटीएम, महाराष्ट्र बँकेचे एटीएम, बाजार चौक कोराडी येथे इंडिकॅश एटीएम, संघदीप बुद्धविहार महादुला येथे हिताची एटीएम, कंभाले टॉवर येथे बँक ऑफ बडोदा एटीएम, महादुला टी पॉईंट जवळ एचडीएफसीचे एटीएम, गणेश नगरी येथे युनियन बँक एटीएम, कोराडी नाका येथे एचडीएफसी बँकेचे एटीएम, विद्यानगर मॉडल स्कूल येथे कॅनरा बँकेचे एटीएम तर याच एरियात शेर-ए-पंजाब जवळ हिताची मणिपोस्टचे एटीएम आहे. या एकूण अठरा एटीएमपैकी सोळा एटीएमवर कोणत्याही वेळेला गार्ड नसतो. याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गार्ड नेमण्यात यावा अशा प्रकारचे पत्रही पोलीस यंत्रणेने संबंधित बँकेच्या व्यवस्थापकांना दिले आहे.
बँकेतही गार्ड नाही
या परिसरात ११ बँक आहेत वीज वसाहतीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केवळ कार्यालयीन वेळेत सुरक्षा रक्षक आहे. तिरुपती अर्बन को-ऑप बँक पांजरा येथे कार्यालयीन वेळेत गार्ड तर दोन बँकेत मध्ये मात्र २४ तास गार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर नागरिक सहकारी को-ऑपरेटिव्ह बँक कोराडी व आयसीआयसीआय बँक गणेश नगरी यांचा समावेश आहे. उर्वरित सात बँकांमध्ये कोणत्याही पाळीत गार्ड नसतो. ज्यामध्ये महादुला येथील बँक ऑफ महाराष्ट्र, विशाल नागरी सहकारी पतसंस्था, इसाप स्मॉल फायनान्स बँक कोराडी, बँक ऑफ बडोदा महादुला, युनियन बँक गणेश नगरी, इंडसइंड बँक गणेश नगरी व सिंडिकेट बँक विद्यानगर बोखारा यांचा समावेश आहे. या बँकांमध्ये ही सुरक्षारक्षक नेमावा असे संबंधितांना वारंवार सुचवण्यात आले आहे. एटीएम व्यवस्थापकांनी आपल्या एटीएमवर किमान रात्रपाळी तरी गार्ड नेमावा, अशी मागणी नागरिकांची आहे