दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंग विरोधात आंदोलनानंतर कडेकाेट सुरक्षा बंदाेबस्त
By निशांत वानखेडे | Published: July 2, 2024 05:59 PM2024-07-02T17:59:36+5:302024-07-02T18:00:53+5:30
चारही भागातील मार्ग केले बंद : सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात प्रवेश बंदी
नागपूर : दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगवरून साेमवारी उसळलेल्या आंदाेलनानंतर मंगळवारी सकाळपासून या परिसरात सुरक्षा बंदाेबस्त वाढविण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाेलिसांनी दीक्षाभूमीवर प्रवेश बंदी लावली असून चारही भागातील वाहतूकही बंद करण्यात आली आहे.
नव्या विकास आराखड्यानुसार दीक्षाभूमीवर भूमिगत पार्किंगविराेधात जनक्षाेभ उसळला व साेमवारी त्याचे पडसाद दिसले. हजाराे आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमी परिसरात तीव्र आंदाेलन केले. बांधकाम साहित्याची जाळपाेळ करून अर्धवट बांधकामाच्या सळाकांची माेडताेड करण्यात आली. त्यामुळे दिवसभर या परिसरात तणावाचे वातावरण हाेते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्याच्या घाेषणेनंतर जनक्षाेभ शांत झाला.
दरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मंगळवारी संपूर्ण परिसरात कडेकाेट बंदाेबस्त करण्यात आला. सकाळपासून चारही बाजुने दीक्षाभूमिकडे जाणारे मार्ग बंद करून प्रवेशबंदी लावण्यात आली. काछीपुरा चाैक ते अण्णाभाऊ साठे स्मारक चाैक ते लक्ष्मीनगर व लक्ष्मीनगर ते बजाजनगर हे मार्ग बॅरिकेड लावून बंद करण्यात आले. कुणालाही आतमध्ये प्रवेशास मनाई करण्यात आली.
नियमित अभिवादनासही सध्या बंदी
यादरम्यान नियमित अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांनाही प्रवेशास बंदी करण्यात आली. त्यामुळे अभिवादनास आलेल्या काही महिलांशी पाेलिसांची बाचाबाची झाल्याचीही माहिती आहे. मात्र उसळलेल्या जनक्षाेभानंतर बांधकामाचे साहित्य दीक्षाभूमी परिसरात विखुरलेले आहेत. लाेखंडाच्या सळाका निघाल्या आहेत व साहित्यही पसरलेले आहेत. या साहित्यामुळे लाेकांना इजा हाेण्याची व अपघात हाेण्याची शक्यता लक्षात घेत प्रवेश बंदी करण्यात आली असल्याचे पाेलीस प्रशासनाने म्हणणे आहे. मात्र वेगळा संदेश जाण्याची शक्यता लक्षात घेता अनुयायांना बंदी करू नये, असे लाेकांचे म्हणणे हाेते.
परिसरात वाहतुकीचा खाेळंबा
दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात कडेकाेट बंदाेबस्त लावल्यानंतर काछीपुरा ते अण्णाभाऊ साठे स्मारक चाैक ते लक्ष्मीनगर चाैक ते बजाजनगर या मार्गाची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा माेठा गाेंधळ उडाल्याचे दिसले. एकिकडे अंबाझरीचा मार्ग बंद, दुसरीकडे व्हीएनआयटी गेट ते श्रद्धानंद चाैकापर्यंत बांधकाम साहित्य पडले असल्याने वाहतुकीचा बाेजवारा उडत असताना दीक्षाभूमी परिसरातील मार्ग बंद झाल्याने माेठा खाेळंबा दिसून येत आहे. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याचेही पहावयास मिळाले.