देशाची सुरक्षा सैन्यावरच अवलंबून : अशोक मोठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 10:54 PM2019-04-05T22:54:06+5:302019-04-05T22:56:39+5:30
ढोंगी मानवतावादी, तथाकथित बुद्धिवादी व पुरोगामी लोकांच्या सानिध्यात भारत सुरक्षित राहू शकत नाही. देशाची सुरक्षितता खऱ्या अर्थाने सैन्यावरच अवलंबून आहे, असे परखड मत विंग कमांडर अशोक मोठे यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ढोंगी मानवतावादी, तथाकथित बुद्धिवादी व पुरोगामी लोकांच्या सानिध्यात भारत सुरक्षित राहू शकत नाही. देशाची सुरक्षितता खऱ्या अर्थाने सैन्यावरच अवलंबून आहे, असे परखड मत विंग कमांडर अशोक मोठे यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
देशातील सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पद्मगंधा प्रतिष्ठान व रसिकराज कला संस्थेतर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या विदर्भातील संजय विक्रमसिंह राजपूत यांच्याप्रती संवेदना व्यक्त करीत त्यांच्या पत्नी सुषमा राजपूत यांना लोकसहभागातून गोळा झालेला ५१ हजार रुपयांचा निधी कृतज्ञतापूर्वक समर्पित करण्यात आला. याप्रसंगी सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन दीपक लिमसे, पद्मगंधाच्या अध्यक्षा शुभांगी भडभडे, उपाध्यक्षा विजया ब्राह्मणकर, रसिकराजचे अध्यक्ष डॉ. बळवंत भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. अंजली परनंदीवार यांनी गायलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो...’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अशोक मोठे म्हणाले, संजय राजपूत हे ११ फेब्रुवारीला नागपूरला येऊन गेले होते. नुकताच त्यांनी आपला कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवून घेतला होता व ११५ बटालियनमध्ये कार्यरत होते. आजपर्यंत परराष्ट्र धोरण मावळ स्वरूपाचे होते. सर्जिकल स्ट्राईक ही धर्मयुद्धाच्या जवळची कल्पना असल्याचे ते म्हणाले. यावेळी कॅप्टन दीपक लिमसे यांनी पुलवामा हल्ल्यानंतर १४ दिवसात प्रतिहल्ला करणाऱ्या सैनिकांच्या कारवाईचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देणाऱ्या सुषमा राजपूत ‘धन्यवाद’ या शब्दाशिवाय काहीच बोलू शकल्या नाही. बाकीच्या भावना अश्रु रूपात बाहेर आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजया ब्राह्मणकर यांनी केले. संचालन स्वाती मोहरीर यांनी केले. परिणिता कवळेकर यांनी आभार मानले.