समाजाचा रक्षकच असुरक्षित!
By Admin | Published: September 19, 2016 02:54 AM2016-09-19T02:54:25+5:302016-09-19T02:54:25+5:30
पोलीस हा सुद्धा माणूस आहे. त्याला मन आहे, भावना आहे, कुटुंब आहे. मात्र सध्याच्या व्यवस्थेत त्याचा कुठेही विचार होताना दिसून येत नाही.
पोलीस हा सुद्धा माणूस आहे, त्याला भावना आहेत : कुटुंबीयांचा आक्रोश
नागपूर : पोलीस हा सुद्धा माणूस आहे. त्याला मन आहे, भावना आहे, कुटुंब आहे. मात्र सध्याच्या व्यवस्थेत त्याचा कुठेही विचार होताना दिसून येत नाही. त्याला एखाद्या निर्जीव यंत्राप्रमाणे राबविल्या जाते. त्याच्या खांद्यावर समाजाच्या सुरक्षेची धुरा दिली आहे, मात्र त्याच्या सुरक्षेची कुणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. संपूर्ण देश जेव्हा एखादा उत्सव साजरा करीत असतो, तेव्हा पोलीस हा आपले कर्तव्य बजावत असतो. लोकांची सुरक्षा करीत असतो. त्याला कधीही दिवाळी, दसरा नसतो. कौटुंबिक आनंद नसतो. त्याच्यापुढे केवळ कर्तव्य असते. मात्र असे असताना त्याच्यावर सतत होत असलेल्या हल्ल्यांनी पोलीस विभाग आणि समाजात एक चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. समाजाचा हा रक्षकच आज असुरक्षित झाल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकत्याच दोन दिवसांपूर्वी नागपुरात वाहतूक पोलीस हवालदार प्रकाश बारंगे यांच्यावर एका आरोपीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना पुढे आली आहे. शिवाय यापूर्वी राज्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. यानिमित्ताने रविवारी ‘लोकमत’ व्यासपीठाच्या मंचावर एका चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.
या चर्चेत पोलिसांच्या पत्नी, पोलीस मित्र, राष्ट्र निर्माण संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, आणि महाराष्ट्र पोलीस परिवार व मित्र न्याय हक्क संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला होता. दरम्यान रात्रंदिवस प्राणाची पर्वा न करता समाजाची सुरक्षा करणारा पोलीस हाच आज स्वत: असुरक्षित झाला असल्याचा आक्रोश करण्यात आला. यावेळी राष्ट्र निर्माण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय मारोडकर, सचिव नीलेश नागोलकर, पोलीस मित्र डॉ. आशिष अटलोए, पोलीस मित्र प्रशांत भारती, अॅड़ भूषण जोशी, पोलीस शिपायाच्या पत्नी स्मिता मुसळे, आशा डोंगरे, प्रवीण बोरकर, गोपाल बडोले, अॅड़ संदीप लाहबर, सामाजिक कार्यकर्त्या मोना रामानी, कविता नागोलकर, चेतन माहूरकर, अॅड़ मिलिंद कलार, ओमप्रकाश जयस्वाल व अॅड़ भोजराज कुंभलवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
तोही एक माणूसच...
पोलीस दल शिस्तीचा विभाग आहे. त्यामुळे पोलीस स्वत:चे हक्क आणि अधिकारासाठी भांडू शकत नाही. रस्त्यावर उतरू शकत नाही. शिवाय मोकळ्या मनाने आपले दु:ख आणि भावनाही व्यक्त करू शकत नाही. मात्र त्याच्या वर्दीच्या आत सुद्धा एक माणूस आहे. त्यालाही भावना आहे. सुखदु:ख आहे. इच्छाआकांक्षा आहेत. याचा कुठेही विचार होईल का, असा यावेळी पोलिसांच्या पत्नीही प्रश्न उपस्थित करून सध्याच्या व्यवस्थेत पोलिसांच्या पत्नी एका विधवेचे जीवन जगत असल्याच्या तीव्र संताप त्यांनी व्यक्त केला. पती हा घरातून बाहेर गेला की तो कधी घरी परत येईल, याची काहीही वेळ नसते. मुलाबाळांना कधी वेळ देऊ शकत नाही. सण-उत्सवात कधी सहभागी होत नाही. उलट कामाचा सतत तणाव आणि वरिष्ठांच्या दबावात तो जगत असतो. यातून पोलिसांच्या कुटुंबासमोर असंख्य प्रश्न उभे ठाकले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
समाजाने पोलिसांसोबत सहकार्य करावे
पोलीस हा समाजाचे रक्षण करतो. मात्र जेव्हा एखादा पोलीस संकटात सापडतो. त्याच्यावर कुणी हल्ला करतो. तेव्हा समाज त्याच्या मदतीला धावून येत नाही. अशावेळी समाजाने पोलिसांसोबत सहकार्य केले पाहिजे. त्यांच्या मदतीला धावले पाहिजे. पोलीस हा प्रचंड तणावात काम करीत असतो. त्याला चार-चार महिने सुट्या मिळत नाही. मात्र अशाही स्थितीत तो समाजाची सुरक्षा करीत असतो. तो सुद्धा एक माणूस आहे. जनावर नाही. याचा कुठे तरी विचार झाला पाहिजे.
स्मिता मुसळे, पोलिसाची पत्नी.
पोलिसांची संघटना असावी
सध्या राज्यात पोलिसांची कोणतीही संघटना नाही. त्यामुळे पोलीस संघटित होऊ शकत नाही. शिवाय त्यांना हक्क आणि अधिकारासाठी आवाज उठविता येत नाही. यासाठी राज्यातील पोलिसांची एक संघटना असणे आवश्यक आहे. यातून पोलिसांच्या समस्या व मागण्यांना वाचा फोडता येईल. शिवाय सरकारला सुद्धा त्यांची दखल घ्यावी लागेल. आज प्रत्येक पोलीस हा अतिरिक्त कामाच्या ताणामुळे त्रस्त झाला आहे. मात्र तो आपले दु:ख आणि समस्या कुणालाही सांगू शकत नाही. कारण त्याकडे कोणतेही संघटन नाही. त्याच्या कुटुंबाला राहायला योग्य क्वॉर्टर नाही. पोलीस ठाण्यात सोईसुविधा नाही. मात्र असे असताना तो सर्वकाही निमूटपणे सहन करीत आहे.
अॅड़ भूषण जोशी, सामाजिक कार्यकर्ते.
पोलीस संरक्षण कायदा व्हावा
राज्यात दिवसेंदिवस पोलिसांवर हल्ले वाढत आहे. त्यामुळे सर्वांसाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे. असे हल्ले रोखण्यासाठी आरोपीला लगेच अटक झाली पाहिजे. शिवाय यासंबंधीचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. यासाठी स्वतंत्र पोलीस संरक्षण कायदा तयार करण्याची गरज आहे. अनेकदा प्रसार माध्यमांव्दारे पोलिसांविषयी चुकीची माहिती प्रसारित केल्या जाते. यातून पोलिसांबद्दल समाजात व्देष निर्माण होतो. एखादा मोर्चा किंवा आंदोलन थोपविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला की, त्यासाठी पोलिसांना दोषी धरल्या जाते. मात्र हे चुकीचे असून, यामुळे समाजात पोलिसांविषयी व्देष निर्माण होतो.
डॉ. आशिष अहलोए, सामाजिक कार्यकर्ते.
पोलिसांवर मानसिक ताण वाढतो
पोलिसांवर दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत आहे. यातून त्यांच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न निर्माण होत आहे. यातूनच मागील २१ आॅगस्ट रोजी पोलीस शिपाई प्यारेलाल बडोले यांचा पाचपावली पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना अचानक मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही मदत मिळाली नाही. प्यारेलाल यांच्या पाठीमागे मुलगा-मुलगी व पत्नी असा परिवार आहे. मात्र असे असताना अजूनपर्यंत त्यांना कोणताही लाभ मिळालेला नाही. अशा घटनांमुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.
गोपाल बडोले, मृत पोलीस शिपायाचे बंधू.
बदलीत भेदभाव
एका जिल्ह्यातील पोलिसाची दुसऱ्याच जिल्ह्यात कुठेतरी बदली केल्या जाते. यामुळे तो नेहमी आपल्या कुटुंबापासून दूर राहतो. जो समाजाची सुरक्षा करतो, तो मात्र आपल्या स्वत:च्या कुटुंबाची सुरक्षा करू शकत नाही. पोलीस दलात ज्याच्या खिशात पैसा आहे, तो आपल्या मर्जीनुसार सोईच्या ठिकाणी बदली करून घेतो, परंतु जो प्रामाणिकपणे काम करतो, त्याला कुठे तरी दूर फेकल्या जाते. वास्तविक २०१० च्या शासकीय अध्यादेशानुसार २०० किलोमीटरच्या आतच बदली करणे अपेक्षित असते. परंतु त्याचे कुठेही पालन होताना दिसून येत नाही.
नीलेश नागोलकर, सचिव - राष्ट्र निर्माण संघटना,
दिवाळी-दसरा नसतोच
पोलीस शिपायाच्या घरी कधीच दिवाळी-दसरा नसतो. एखाद्या उत्सवाच्या तीन महिन्यापूर्वीपासून सुट्या बंद केल्या जातात. यामुळे घरी पतीच राहत नसल्याने उत्सवाचा आनंदच नसतो. अशाप्रकारे प्रत्येक पोलिसाचे कुटुंब विविध समस्यांचा सामना करीत आहे. मात्र पोलिसांची कोणतीही संघटना नसल्याने तो आवाज उठवू शकत नाही. मोर्चा काढू शकत नाही. आंदोलन करू शकत नाही. शिवाय कारवाईच्या भीतीने कुणी पुढे येत नाही. वरिष्ठांच्या माध्यमातून त्याचा आवाज दाबला जातो.
आशा डोंगरे, पोलिसाची पत्नी.
पोलिसांचे समुपदेशन व्हावे
एखादी व्यक्ती पोलीस दलात भरती झाल्यानंतर, त्याला एक वर्षांचे प्रशिक्षण दिल्या जाते. यात त्याला बंदूक चालविण्यापासून तर गुन्हेगारांशी दोन हात करण्यासाठी सज्ज केल्या जाते. मात्र त्यासोबतच त्याला चांगल्या वर्तवणुकीचे धडेसुद्धा देण्याची गरज आहे. अनेकदा पोलिसांच्या गैरवर्तवणुकीमुळेसुद्धा अनेक घटना घडतात. पोलीस हा नेहमी मानसिक ताणावात राहत असला, तरी अशा घटना टाळण्यासाठी त्यांचे प्रत्येक महिन्याला समुपदेशन झाले पाहिजे. त्यांना यासाठी विशेष मार्गदर्शन केले पाहिजे.
प्रवीण बोरकर, सामाजिक कार्यकर्ते.
पोलिसांना आरोग्य सुविधा मिळाव्यात
पोलीस हा नेहमी तणावात काम करीत असतो. अशा स्थितीत त्याच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र कोणत्याही पोलीस ठाण्यात प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध दिसून येत नाही. शिवाय प्रत्येक महिन्याला त्यांची आरोग्य तपासणी झाली पाहिजे. मात्र कुठेही अशी आरोग्य सुविधा दिसून येत नाही. विशेष म्हणजे, सेवानिवृत्ती पोलिसांना आरोग्याच्या समस्येचा अधिकच सामना करावा लागतो. सेवानिवृत्तीनंतर त्यांना कोणत्याही वैद्यकीय सेवा पुरविल्या जात नाही.
अॅड़ संदीप लाहबर, सामाजिक कार्यकर्ते.
खासगी कार्यक्रमात बंदोबस्त का?
राज्यातील पोलिसांची संख्या कमी असल्याने त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण वाढत आहे. असे असताना अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या खासगी कार्यक्रमात पोलिसांना तैनात केल्या जाते. त्यांचा बंदोबस्त लावल्या जातो. हा जनतेचा पैसा आणि पोलीस दलाचा दुरुपयोग असून, तो थांबला पाहिजे. राजकीय पुढाऱ्यांच्या खासगी कार्यक्रमातील पोलिसांची तैनाती रोखली पाहिजे. पोलीस अगोदरच तणावात काम करीत आहे. अशा स्थितीत त्यांच्यावर या बंदोबस्ताचा पुन्हा ताण वाढतो.
मोना रामानी, सामाजिक कार्यकर्त्या.