नाना पटोले यांच्या नागपुरातील घराबाहेर सुरक्षाव्यवस्था वाढवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 12:20 PM2022-01-18T12:20:27+5:302022-01-18T12:39:33+5:30
नागपूर पोलिसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरासमोर सुरक्षा वाढवली आहे.
नागपूर : मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे, पोलिसांनी पटोले यांच्या नागपूर निवासस्थानाबाहेरी सुरक्षा वाढवली आहे.
मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर, नाना पटोले यांनी सारवासारव करत, माझे विधान गावातील गावगुंड असलेल्या मोदीनामक व्यक्तीबद्दल होते, असे त्यांनी म्हटलं. मात्र, भाजप नेते यावरुन चांगलेच संतापले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करुन पटोलेंसह काँग्रेसला लक्ष्य केलंय. तर, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितीन गडकरी यांनी पटोलेंच्या अटकेची मागणी केली आहे.
दरम्यान, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांनी पटोलेविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यातून जाणार नसल्याची भूमिका बावनकुळे यांनी घेतली आहे.