नागपुरातील मनोरुग्णालयाच्या सुरक्षेलाच भगदाड! सुरक्षा रक्षकाच्या दारुपार्टीचा  व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 08:39 PM2021-11-23T20:39:41+5:302021-11-23T20:40:39+5:30

Nagpur News प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांसह डॉक्टर व परिचारिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला सुरक्षा रक्षकच ड्यूटीच्या जागेवर दारूची पार्टी करीत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.

The security of the psychiatric hospital in Nagpur is in jeopardy! Security guard's alcohol party video goes viral | नागपुरातील मनोरुग्णालयाच्या सुरक्षेलाच भगदाड! सुरक्षा रक्षकाच्या दारुपार्टीचा  व्हिडिओ व्हायरल

नागपुरातील मनोरुग्णालयाच्या सुरक्षेलाच भगदाड! सुरक्षा रक्षकाच्या दारुपार्टीचा  व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext

नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांसह डॉक्टर व परिचारिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला सुरक्षा रक्षकच ड्यूटीच्या जागेवर दारूची पार्टी करीत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी संबंधित रक्षक व कर्मचाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

शासनाने मनोरुग्णालयाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मात्र, वेड्यांकडे काय लक्ष द्यावे, या भावनेतूनच या रुग्णालयांना सोयी पुरविल्या जात असल्याने याचा फटका रुग्णांसोबत रुग्णालय प्रशासनाला बसत आहे. सरकारी अनास्थेमुळे नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे.

शासनाचा अपुरा निधी, आवश्यक औषधांचा तुटवडा, मूलभूत सोयींचा अभाव डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता, पर्यायी उपचारांची वानवा अशा त्रुटींमुळे इथल्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे. सध्या मनोरुग्णालयात जवळपास ५०० स्त्री व पुरुष रुग्ण उपचार घेत आहेत. परिस्थितीमुळे त्यांचा स्वत:शी मानसिक संघर्ष सुरू आहे. या संघर्षात त्यांना मिळणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांची साथ मोलाची आहे. मात्र, तोकड्या सोयींमुळे रुग्णांवर याचा परिणाम होत आहे.

असे असताना दुसरीकडे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला सुरक्षा रक्षकच रुग्णालयाच्या आत दारूच्या पार्ट्या करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे रुग्णांची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे.

- ‘गार्ड रूम’मध्ये चालते रोज पार्टी

रुग्णालयातील वॉर्डाकडे जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘गार्ड रूम’ आहे. येथे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकावर वॉर्डातील रुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. वॉर्डात बाहेरील व्यक्तींना परवानगी शिवाय आत जाण्यास मनाई आहे. परवानगी असलेल्या व्यक्तीची रजिस्टरमध्ये नोंद करणे आवश्यक आहे. परंतु सुरक्षा रक्षकच दारूच्या नशेत राहत असेल तर सुरक्षा कशाची हा प्रश्न आहे. सूत्रानुसार, सायंकाळ होताच ‘गार्ड रूम’मध्येच दारूच्या पार्ट्या होतात.

-४२ एकर परिसरासाठी केवळ १२ सुरक्षा रक्षक

प्रादेशिक मनोरुग्णालय हे ४२ एकर परिसरात पसरलेले आहे. परंतु त्या तुलनेत सुरक्षेची जबाबदारी केवळ १२ सुरक्षा रक्षकांवर आहे. हे सर्व रक्षक कायमस्वरूपी कामावर आहेत. एका पाळीत तीन सुरक्षा रक्षकांची ड्यूटी लावली जाते. महिलांच्या वॉर्डात महिला सुरक्षा रक्षक तैनात राहतात. परंतु वॉर्डाकडे जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारावरच सुरक्षा रक्षक दारूच्या पार्ट्या करीत असेल तर कधीही अघटित घटना घडण्याची शक्यता आहे.

व्हिडिओमध्ये दारू पित असलेला सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे. नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

-डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय

Web Title: The security of the psychiatric hospital in Nagpur is in jeopardy! Security guard's alcohol party video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.