प्रजासत्ताक दिनानिमित्त उपराजधानीत चोख सुरक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 12:34 AM2020-01-26T00:34:24+5:302020-01-26T00:35:49+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त उपराजधानीतील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. विधानभवनासह सर्व महत्त्वाच्या ठिकाणांभोवती अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त उपराजधानीतील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. विधानभवनासह सर्व महत्त्वाच्या ठिकाणांभोवती अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे.
वाहतूक शाखेतील ५० पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण दोन हजार पोलीस प्रजासत्ताक दिनाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. प्रजासत्ताकदिनी दहशतवादी उपद्रव करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणेने यापूर्वीच दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात महत्त्वाच्या तसेच संवदेनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. विमानतळ, रेल्वेस्थानक, विधानभवन, संघ मुख्यालय, दीक्षाभूमी, सीताबर्डी किल्ला, कस्तूरचंद पार्क, विविध मॉल्स आणि बाजारपेठेत सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणी विविध बॉम्ब शोधक व नाशक पथक शोधाशोध करीत आहेत.
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उपराजधानीतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. आवश्यक त्या ठिकाणी सशस्त्र जवानांना नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. अतिशीघ्र कृती दलाच्या जवानांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. सायंकाळपासूनच शहरात गस्त वाढवण्यात आली. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले.
आयुक्तांकडून शुभेच्छा!
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी नागपूरकरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम साजरे करताना कोणतीही संशयित वस्तू अथवा व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही डॉ. उपाध्याय यांनी केले.