सुरक्षा, सतर्कता आणि साधनसुविधांची सांगड

By Admin | Published: February 21, 2016 03:01 AM2016-02-21T03:01:14+5:302016-02-21T03:01:14+5:30

राज्याचे पोलीस कसे हायटेक झाले, त्यांच्याकडे गुन्हेगारीचा मुकाबला करण्यासाठी कशी अत्याधुनिक उपकरणे, हत्यारे आणि साधनसुविधा आहेत,

Security, vigilance and equipment facilities | सुरक्षा, सतर्कता आणि साधनसुविधांची सांगड

सुरक्षा, सतर्कता आणि साधनसुविधांची सांगड

googlenewsNext

पोलीस दलाच्या ‘टेक एक्स्पो’ला मुख्यमंत्र्यांची भेट : हजारो नागपूरकरांना लाभ
नागपूर : राज्याचे पोलीस कसे हायटेक झाले, त्यांच्याकडे गुन्हेगारीचा मुकाबला करण्यासाठी कशी अत्याधुनिक उपकरणे, हत्यारे आणि साधनसुविधा आहेत, त्याची साक्ष पटविणाऱ्या ‘टेक एक्स्पो’ला शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. नागरिकांना पोलिसांच्या अधिक जवळ आणण्याच्या हेतूने पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी काही उपक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार सुरक्षा, सतर्कता आणि साधनसुविधांची सांगड घालून शहर पोलिसांनी पोलीस मुख्यालय, शिवाजी स्टेडियममध्ये प्रदर्शनाचे आयोजन करून नागरिकांना एक आगळीवेगळी भेट दिली.
बालकांपासून वृद्धांपर्यंत आणि घर, कार्यालयापासून परिसरापर्यंतची कशी सुरक्षा केली जाऊ शकते, त्यासाठी कशाचा वापर करायचा, त्याची माहिती देतानाच पोलिसांनी गुन्हेगार, व्यसनांपासून आणि वाहनांपासून कशी स्वत:ची सुरक्षा करायची, काय काळजी घ्यायची, त्याच्याही टीप्स दिल्या. प्रदर्शनात किड ट्रॅकर, सीसीटीव्हीची शृंखला, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, पोलिसांकडील वैशिष्ट्यपूर्ण वाहने, हेल्मेट, स्पीड गन, अंमली पदार्थ आदींचे स्टॉल होते.
प्रत्येक स्टॉलवर संबंधित माहितगार अन् पोलीस अधिकारी, कर्मचारी भेट देणाऱ्यांना महत्त्वपूर्ण माहिती देत होते. दोन दिवसात हजारो विद्यार्थी अन् नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन पोलिसांनी केलेल्या सुरक्षेच्या जागराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही शनिवारी दुपारी प्रदर्शनाला भेट देऊन उत्कृष्ट आयोजनासाठी पोलीस दलाचे कौतुक केले.
आयोजनासाठी पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, रंजनकुमार शर्मा, उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस दलातील विविध अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे प्रशंसनीय योगदान लाभले. नागपूरकरांनीही या अभिनव उपक्रमाला भेट देऊन पोलीस दलाच्या या पुढाकाराचे कौतुक केले. (प्रतिनिधी)

मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत काढला सेल्फी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदर्शनातील प्रत्येक दालनाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर प्रवीण दटके, पोलीस आयुक्त एस. पी. यादव, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, रंजन शर्मा, पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर, संजय लाटकर, शैलेश बलकवडे, इशू सिंधू तसेच इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून घेतली. यावेळी एक छोटा लघुपट उपायुक्त मासिरकर यांनी सादर केला तर, प्रदर्शनाची माहिती मुख्यमंत्र्यांना रंजन शर्मा यांनी दिली.
सीसीटीव्हीची शृंखला
गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही महत्त्वाची भूमिका वठविते. प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रकारच्या सीसीटीव्हीची शृंखला उपलब्ध होती.

अत्याधुनिक शस्त्रास्त्रे
पोलिसांकडे पूर्वी संगीन लावलेली लांबलचक रायफल असायची. ती चालवायला आणि सांभाळायलाही त्रास व्हायचा. आता मात्र पोलिसांकडे अत्याधुनिक इन्सास, एसएलआर, कार्बाईन, एके ४७, ५६ अशी हत्यारे आलेली आहेत. एकदाच ट्रिगर दाबल्यानंतर अनेक गोळ्या चालणाऱ्या बंदुका आणि प्रारंभीच्या ३०३ रायफल या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहेत.
वैशिष्ट्यपूर्ण वाहने
प्रदर्शनात अनेक प्रकारची वाहने आहेत. त्यातील खास आकर्षण म्हणजे, बुलेटप्रूफ वाहने होय. ही वाहने सीमेवरील जवानांच्या वापरात असतात. नक्षलग्रस्त भागातही या वाहनांचा वापर होतो. दहशतवादी, नक्षलवादी रस्त्यावर बॉम्ब पेरून किंवा सुरक्षा जवानांच्या वाहनांवर बॉम्ब फेकून घातपात करतात. मात्र, या वाहनांवर बॉम्बस्फोटाचा कसलाही परिणाम होत नाही. बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव झाला तरी या वाहनातील जवानांना कसलीही इजा पोहचत नाही. प्रदर्शनातील पोलिसांच्या अत्याधुनिक संचार प्रणालीसाठी वापरली जाणारी सॅटेलाईट व्हॅनसुद्धा आकर्षणाचे केंद्र होती.

वज्रचे महत्त्व
दंगा नियंत्रण करण्यासाठी वज्र वाहन वापरले जाते. पाण्याचा मारा करण्यासाठी, समाजकंटकांना पिटाळण्यासाठी ज्या वाहनाचा पोलीस वापर करतात, त्याला व्रज वाहन म्हटले जाते. दंगा नियंत्रण पथक या वाहनाचा आणीबाणीच्या वेळी उपयोग करतात.
हेल्मेट ते स्पीड गन
रस्त्याने जाताना काय खबरदारी घ्यायची, पोलिसांकडून सुरक्षेसाठी कसली कारवाई केली जाते, त्याची माहिती देणाराही स्टॉल होता. त्यात हेल्मेट, ब्रीथ अ‍ॅनालायझरपासून स्पीड गनपर्यंतची उपकरणे होती. हेल्मेट न घातल्यास कसे गंभीर परिणाम होतात, वेगात वाहन चालविणाऱ्यांवर स्पीड गनच्या माध्यमातून तर दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर ब्रीथ अ‍ॅनालायझरच्या माध्यमातून वाहतूक पोलीसांकडून कशी कारवाई केली जाते, ते सांगितले जात होते.
अंमली पदार्थ
प्रदर्शनात पोलिसांनी गांजा, चरस, अफू, ब्राऊनशुगर (हेरॉईन) ठेवले होते. त्याच्या व्यसनामुळे माणूस कसा रसातळाला जातो ते सांगण्यासोबतच ते वापरणे, बाळगणे आणि विकणे किंवा विकत घेणे कायद्याच्या दृष्टीने किती भयावह परिणामाला सामोरे नेण्यास कारणीभूत ठरते, त्याची माहिती पोलीसदादा देत होते.
फिंगर प्रिंट
गुन्हेगारांना शोधण्यासाठी फिंगर प्रिंट (बोटांचे ठसे) महत्त्वाचे ठरते. प्रत्येक पोलीस ठाण्यात त्याचमुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे बोटांचे ठसे घेतले जाते. ठसेतज्ज्ञ ठसे कसे गोळा करतात, त्याची कशी जुळवणी केली जाते, त्यासाठी कोणते पावडर, ब्रश वापरले जातात, त्याची माहिती उपलब्ध.

Web Title: Security, vigilance and equipment facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.