सुरक्षा भिंत पडली : १४५०० मेट्रिक टन धान्याची सुरक्षा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 09:42 PM2019-01-23T21:42:47+5:302019-01-23T21:46:18+5:30
पूर्व नागपुरातील वर्धमाननगर येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडाऊनची सुरक्षा भिंत मागील सव्वा महिन्यापासून कोसळली आहे. गोदामात १४५०० मेट्रिक टन धान्य आहे. परंतु सुरक्षा भिंतीच्या डागडुजीसाठी महामंडळातर्फे काहीच उपाययोजना न करण्यात आल्यामुळे गोदामातील धान्याच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपुरातील वर्धमाननगर येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडाऊनची सुरक्षा भिंत मागील सव्वा महिन्यापासून कोसळली आहे. गोदामात १४५०० मेट्रिक टन धान्य आहे. परंतु सुरक्षा भिंतीच्या डागडुजीसाठी महामंडळातर्फे काहीच उपाययोजना न करण्यात आल्यामुळे गोदामातील धान्याच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्रीय वखार महामंडळाचे पूर्व नागपुरातील वर्धमाननगर परिसरात गोडाऊन आहे. आठ एकर परिसरातील भव्य जागेवर असलेल्या या गोडाऊनमध्ये १४ हजार ५०० मेट्रिक टन धान्य ठेवण्यात येते. मागील सव्वा महिन्यापूर्वी या गोडाऊनची १०० मीटर असलेली सुरक्षा भिंत कोसळली आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये धान्य असूनही महामंडळाने सुरक्षा भिंत उभारण्यासाठी काहीच उपाययोजना केलेली दिसत नाही. गोडाऊनच्या सुरक्षेसाठी तीन पाळीत सुरक्षा रक्षक ड्युटीवर राहतात. परंतु आठ एकर परिसरातील या गोडाऊनची सुरक्षा सुरक्षा भिंतीच्या अभावी कशी करावी, असा प्रश्न सुरक्षा रक्षकांना पडला आहे. त्यामुळे या गोडाऊनमधील धान्याची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षा भिंतीचे काम त्वरित करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अधिकारी म्हणतात, तुम्हीच भिंत बांधा
केंद्रीय वखार महामंडळाच्या कोसळलेल्या भिंतीबाबत मुंबई येथील प्रादेशिक व्यवस्थापक ए. के. दुबे यांचे लक्ष वेधले. त्यांनी कोसळलेल्या भिंतीबाबत काय कारवाई केली याची माहिती देण्यास नकार दिला. गोदामातील धान्य चोरीला जाऊ शकते असा प्रश्न विचारला असता तुम्हीच भिंत बांधा, असे अफलातून उत्तर दिले.