२३ जुलैला पहा ‘निओवाईस’ धूमकेतू ; पृथ्वीजवळ आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 11:12 AM2020-07-22T11:12:51+5:302020-07-22T12:55:00+5:30

२३ जुलै रोजी म्हणजे गुरुवारी हा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे.

See 'Neowise' comet on July 23; Came near the earth | २३ जुलैला पहा ‘निओवाईस’ धूमकेतू ; पृथ्वीजवळ आला

२३ जुलैला पहा ‘निओवाईस’ धूमकेतू ; पृथ्वीजवळ आला

googlenewsNext
ठळक मुद्दे साडेचार हजार वर्षांनंतर आला योगसाध्या डोळ्यांनी पाहता येणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आकाराने पाच किलोमीटरपर्यंत विस्तारलेला असलेला ‘निओवाईस’ हा धूमकेतू सध्या पृथ्वीभोवतीच्या अवकाशात दिसू लागला आहे. खगोलीय घडामोडींची आवड असलेले, खगोलशास्त्राचे अभ्यासक आणि सामान्य नागरिकांमध्येही या धूमकेतूची चर्चा सुरू आहे. २३ जुलै रोजी म्हणजे गुरुवारी हा धूमकेतू पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे. पृथ्वीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही, कारण हे जवळचे अंतर तब्बल १० कोटी ३० लाख किलोमीटरचे आहे. मात्र या अंतरावरूनही साध्या डोळ्याने दिसेल, इतके तेजस्वी त्याचे रूप आहे.

नुकतेच २७ मार्च रोजी सूर्याजवळून जात असताना निओवाईस या धूमकेतूचा शोध लागला. नासाच्या दुर्बिणीतून वायव्यकडच्या आकाशाकडे या धूमकेतूचे दर्शन घडले. सी/२०२० एफ३ ही निओवाईसची खगोलीय ओळख आहे. रमण विज्ञान केंद्राचे खगोलशास्त्राचे शिक्षक महेंद्र वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार हा धूमकेतू आपल्याच ग्रहमालेतील असून सूर्याभोवती परिक्रमा करतो. त्याला एक परिक्रमा पूर्ण करायला तब्बल ६८०० वर्ष एवढा प्रदीर्घ कालावधी लागतो आणि ही प्रदक्षिणा पूर्ण करून तो पृथ्वीजवळ आला आहे. म्हणजे पुढची प्रदक्षिणा केल्यानंतर ६००० पेक्षा अधिक वर्षांनी म्हणजे इ.स. ८००० नंतरच त्याचे पुन्हा दर्शन होईल.

विशेष म्हणजे १४ जुलैपासून ते ४ ऑगस्टपर्यंत म्हणजे २० दिवस साध्या डोळ्यांनी पाहण्याची अनोखी संधी महाराष्ट्रासह समस्त पृथ्वीवासीयांना लाभणार आहे. सूर्यास्तानंतर वायव्य दिशेला म्हणजेच उत्तर-पश्चिमेच्या आकाशात हा धूमकेतू पाहता येईल. सध्या देशात मान्सूनचे आगमन झाल्याने नीरभ्र आकाश सापडणे दुर्मिळ आहे. मात्र २० दिवसांच्या काळात ही संधी उपलब्ध झाली तर हा दुर्मिळ धूमकेतू पाहणे सोडू नका, असे आवाहन वाघ यांनी केले.

४ ऑगस्टपर्यंत संधी
पूर्वीच्या हेलबॉप याप्रमाणेच तेजस्वी असलेल्या निओवाईसचे अमेरिका व कॅनडा या देशातील नागरिकांनी दर्शन घेतले आहे. भारतातही सगळीकडून त्याचे दर्शन होईल, पण सध्या पावसाळा असल्याने ढगांमुळे तो दिसणे कठीण आहे. मात्र ४ ऑगस्टपर्यंत आकाश स्वच्छ झाल्यास तो सूर्यास्तानंतर नक्की दिसेल, अशी माहिती महेंद्र वाघ यांनी दिली.

धूमकेतूची विशेषता
धूमकेतू हे आपल्या सूर्यमालेचेच घटक असतात. १९९७ साली आलेला हेल-बॉप हा धूमकेतू सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला होता आणि तो पृथ्वीवर आदळेल, अशी प्रचंड भीती त्यावेळी निर्माण झाली होती. त्यानंतर २००७ मध्ये मॅकनॉट नावाचा धूमकेतू पृथ्वीवरून दिसला होता. त्यानंतर साध्या डोळ्यांनी दिसणारा निओवाईस हा तिसरा धूमकेतू होय. सध्या तो १० कोटी ३० लाख किमी अंतर दूर आहे. यांचा आकार ओबडधोबड असतो आणि त्यात धूळ, बर्फ, वायू यांचा समावेश असतो. निओवाईसचा आकार पाच किमीपर्यंत पसरलेला आहे. सूर्याजवळून प्रवास करताना प्रखरतेमुळे त्यांच्यातील बर्फ वितळतो. यामुळे पृथ्वीवरून पाहताना त्यांचे शेपूट दिसते. तसा हा दोन शेपट्यांचा धूमकेतू आहे. एक शेपूट धुलिकणांची असते तर दुसरी वायूंची असते. याच वर्षी स्वॅन आणि अ‍ॅटलास हे दोन धूमकेतूसुद्धा पृथ्वीजवळून गेले होते.

Web Title: See 'Neowise' comet on July 23; Came near the earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.