सरत्या वर्षात आकाशात पहा फिरत्या चांदणीचा नजारा
By निशांत वानखेडे | Published: December 2, 2024 06:47 PM2024-12-02T18:47:14+5:302024-12-02T18:48:47+5:30
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे हाेणार दर्शन : गुरू, शुक्र, शनि आहेतच साेबतीला
निशांत वानखेडे, नागपूर
नागपूर : येत्या काही दिवसात आपण २०२४ ला निराेप देणार आहाेत. या सरत्या वर्षात अंतराळातील घडामाेडी लक्ष वेधणाऱ्या आहेत. यात मानव निर्मित महाकाय आकाराचे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन अर्थात अंतराळ अभ्यास व संशोधन केंद्र भर घालत असून हे स्टेशन महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणाहून ते उघड्या डाेळ्याने पाहता येईल.
येत्या ४, ५ आणि ७ डिसेंबरला एक तेजस्वी चांदणी आकाशात सरकताना दिसेल, हे अनोखे आकाश दृश्य इच्छूकांनी अवश्य बघण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे. सोळा प्रगत देशांच्या संयुक्त विद्यमाने संचलित हा भव्यदिव्य प्रकल्प मानवी कल्याणार्थ नव संशोधनार्थ शून्य गुरुत्वाकर्षणात कार्यरत असून, दिवसाला १५ पृथ्वी प्रदक्षिणा दर सेकंदाला सुमारे साडेसात किलोमीटर वेगाने पूर्ण करताे. तुम्ही ज्या भागात असाल, त्या भागातून पाहू शकणार, असे दाेड यांनी सांगितले. जगभर परिचित अंतराळ संशोधक डॉ. सुनिता विल्यम्स आणि अधिक दहा वैज्ञानिक या केंद्रात असुन पृथ्वी पासून सुमारे चारशे कि.मी दूर असून त्याचा आकार फुटबॉल मैदाना पेक्षाही खूप मोठा असतो. ४ तारखेला सायंकाळी ७.१६ वाजतापासून वायव्य ते दक्षिण पश्चिमेस, ५ तारखेला सायंकाळी ६.२८ पासून वायव्येकडुन आग्नेयेकडे पाहता येईल. ७ तारखेला सायंकाळी ६.२७ वाजतापासून पश्चिम-उत्तर कडून शूक्र ग्रहा जवळून दक्षिणेकडे जाताना दिसेल. याशिवाय सायंकाळी पश्चिम आकाशात तेजस्वी शूक्र, दक्षिण आकाश मध्याशी वलयांकित शनी ग्रह आणि सध्या स्थितीत पृथ्वीच्या जवळ येत असलेला गुरु ग्रह पूर्व क्षितिजावर दिमाखात दर्शनास सज्ज आहे.