मुलाचे कपडे पाहून पित्याला झाले अश्रू अनावर

By admin | Published: January 9, 2015 12:48 AM2015-01-09T00:48:49+5:302015-01-09T00:48:49+5:30

बहुचर्चित युग चांडक अपहरण व खून खटल्याच्या सुनावणीस प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात गुरुवारपासून प्रांरभ झाला.

Seeing the child's clothes, Father became tears | मुलाचे कपडे पाहून पित्याला झाले अश्रू अनावर

मुलाचे कपडे पाहून पित्याला झाले अश्रू अनावर

Next

युग चांडक हत्याकांड खटल्यास प्रारंभ
नागपूर : बहुचर्चित युग चांडक अपहरण व खून खटल्याच्या सुनावणीस प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात गुरुवारपासून प्रांरभ झाला.
सुनावणी दरम्यान आपल्या चिमुकल्याचा फिक्कट निळ्या रंगाचा टी शर्ट आणि डाव्या कानातील सोन्याची बाळी पाहून डॉ. मुकेश चांडक यांना अश्रू अनावर झाले.
मुकेश चांडक हे या प्रकरणातील फिर्यादी आहेत. आपली साक्ष देताना त्यांनी राजेश धनालाल दवारे आणि त्याचा मित्र अरविंद अभिलाष सिंग या दोघांना न्यायालयात ओळखले.
सरतपासणी साक्ष देताना चांडक यांनी सांगितले की, १ सप्टेंबर २०१४ रोजी ही घटना घडली होती. त्या दिवशी मी सकाळी ११ वाजता माझ्या क्लिनिकला निघून गेलो होतो. दोन्ही मुले धृव आणि युग शाळेत गेली होती. धृव हा शाळेच्या बसने तर युग कारने गेला होता. त्या दिवशी माझी पत्नीही सकाळी ११ वाजेपासून क्लिनिकमध्येच होती.
माझ्या ड्रायव्हरचे नाव राजू तोटे आहे. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मला माझी पत्नी प्रेमळ हिने सांगितले की, क्लिनिकच्या काही कर्मचाऱ्यांनी आपल्या गुरुवंदना सोसायटी लकडगंज येथून युगला सोबत नेले आहे. राजू तोटे याने ही माहिती तिला फोनवरून सांगितली होती.
युग हा सदर भागात डान्सिंग क्लाससाठी गेला होता. त्यामुळे माझ्या पत्नीने युगला घरी आणण्यासाठी ड्रायव्हर राजू तोटेला पाठविले होते. परंतु त्याने युग हा क्लनिकच्या कर्मचाऱ्यासोबत दुचाकी वाहनाने गेल्याचे आपल्या मालकिणीला सांगितले होते.
चांडक आपल्या साक्षीत पुढे म्हणाले , बिल्डिंग वॉचमन अरुण मेश्राम याने आपणास असे सांगितले होते की, ३.४५ ते ४ वाजताच्या दरम्यान २०-२२ वर्षांचा एक तरुण स्कूटीने आल्याचे आणि तो लाल रंगाचा टी शर्ट घातलेला असल्याचे सांगितले होते. त्याने युगची चौकशी केली होती. त्याने तोंडाला रुमाल बांधलेला होता. १०-१५ मिनिटातच युग शाळेच्या गणवेशात (आकाशी रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स पँट) परतला होता. युगने स्कूल बॅग वाचमनजवळ दिली होती आणि तो लाल रंगाचा टी शर्ट घातलेल्या तरुणासोबत स्कूटीवर बसून गेला होता.
गुरुवंदना बिल्डिंगजवळ जळाऊ लाकडाच्या विक्रीचा धंदा करणाऱ्या राजन तिवारी याने दोन जण एका मुलाला स्कूटीवर बसवून दाना गंजच्या दिशेने घेऊन गेल्याचे सांगितले होते. तिवारीला युगचे छायाचित्र दाखविले असता तो हाच मुलगा असल्याचे त्याने सांगितले होते, असेही चांडक यांनी साक्षीत सांगितले.
आपण मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार लकडगंज पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
त्यानंतर रात्री ८.१७ आणि ८.४० वाजता आपणास १० कोटी आणि ५ कोटीच्या खंडणीची मागणी करणारे फोन आले होते. (प्रतिनिधी)
अन् युगचा मृतदेहच दिसला
२ सप्टेंबर रोजी आपण मुलाच्या चौकशीसाठी लकडगंज पोलीस ठाण्यात गेलो होतो. रात्री ९ वाजताच्या सुमारास आपणास पोलीस अधिकाऱ्याने सोबत चलण्यास सांगितले होते. आपले वाहन या अधिकाऱ्याच्या मागे होते. पाटणसावंगीपासून लोणखैरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याजवळ पोलिसांचे वाहन थांबले होते. वाहनातून राजेश उतरला होता. त्याच्या मागे पोलीस होते. त्यांना तो नाल्यात घेऊन गेला होता. अर्ध्या तासाने पोलिसांनी आपणास बोलावून मृतदेह दाखविला. तो आपल्या युगचा होता, असेही त्यांनी साक्षीत सांगितले. राजन तिवारी याचीही साक्ष नोंदवण्यात आली. त्याने न्यायालयात दोन्ही आरोपींना तसेच युगचे छायाचित्रही ओळखले. ओळख परेडच्या वेळी याच आरोपींना ओळखल्याचे त्यांने सांगितले. बचाव पक्षाने या दोघांची उलट तपासणी घेतली. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी आणि सरकार पक्षाला सहाय्य म्हणून फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा तर बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप अग्रवाल, अ‍ॅड. मनमोहन उपाध्याय आणि अ‍ॅड. प्रमोद उपाध्याय यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल हे तपास अधिकारी आहेत.

Web Title: Seeing the child's clothes, Father became tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.