बाळाला बघताच आईच्या डोळ्यात आले आनंदाश्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:38 PM2019-07-03T23:38:43+5:302019-07-03T23:39:44+5:30
तीन वर्षांचा बालक रेल्वेस्थानकावर खेळता-खेळता आईवडिलांपासून दूर गेला. त्याला शोधण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी रेल्वेस्थानक पिंजुन काढले. परंतु तो कुठेच आढळला नाही. रडवेल्या चेहऱ्याने त्याची आई इकडेतिकडे त्याचा शोध घेत होती. अखेर कुली अन् ऑटोचालकांनी तो सुखरूप असल्याची अनाऊन्समेंट केल्यानंतर तिने आरपीएफ ठाणे गाठले. बाळाला बघताच आईच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली अन् ती आपल्या बाळाला घट्ट बिलगली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन वर्षांचा बालक रेल्वेस्थानकावर खेळता-खेळता आईवडिलांपासून दूर गेला. त्याला शोधण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी रेल्वेस्थानक पिंजुन काढले. परंतु तो कुठेच आढळला नाही. रडवेल्या चेहऱ्याने त्याची आई इकडेतिकडे त्याचा शोध घेत होती. अखेर कुली अन् ऑटोचालकांनी तो सुखरूप असल्याची अनाऊन्समेंट केल्यानंतर तिने आरपीएफ ठाणे गाठले. बाळाला बघताच आईच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली अन् ती आपल्या बाळाला घट्ट बिलगली.
अली हुसेन (३) असे त्या बालकाचे नाव. वडील मोहम्मद कय्युम (३३) आणि आई मदिना (३०) हे मूळचे पाटण्याचे असून कामाच्या शोधात बुटीबोरी येथील मोहगावला आले. काम संपल्यामुळे ते गावाकडे परत जाण्यासाठी बुधवारी सकाळी ७.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आले. ते प्लॅटफार्म क्रमांक १ वर गाडीची वाट पाहत बसले होते. थोड्या वेळानंतर त्यांना आपले बाळ जवळ नसल्याचे लक्षात आले. त्याला सर्वत्र शोधले पण तो कुठेच आढळला नाही. रेल्वेस्थानकाच्या बाहेर कुली संघटनेचे अध्यक्ष अब्दुल माजिद शेख आणि ऑटो संघटनेचे सहसचिव अल्ताफ शेख हे प्रवासी मिळण्याची वाट पाहत बसले होते. त्यांना एक तीन वर्षांचा चिमुकला प्री पेड बुथजवळ दिसला. त्यांनी या बाळावर लक्ष ठेवले. तो बालक खेळत इकडे तिकडे फिरत होता. २० मिनिटानंतर तो प्लॅटफार्म क्रमांक १ वर गेला. तेथेही त्याचे नातेवाईक नसल्यामुळे तो आईवडिलांपासून दूर गेल्याची जाणीव त्यांना झाली. लगेच त्यांनी बाळाला जवळ घेतले. परंतु काहीच बोलत नसल्यामुळे लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाला कळविले. उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयातून अनाऊ न्समेंट केली. त्यानंतर या बाळाला रेल्वे चाईल्ड लाईनकडे सोपविण्यात आले. तर अनाऊन्समेंट ऐकल्यानंतर त्या बाळाचे आईवडील आले. आईने आपले बाळ दिसताच त्यास मिठी मारून आपल्या डोळ्यातील आसवांना वाट मोकळी करून दिली. हरविलेले बाळ त्यांचेच असल्याची खात्री पटल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक बघेल यांनी त्या बाळास आईवडिलांच्या स्वाधीन केले.