गोरेवाडातील पांढऱ्या 'पाहुण्यां'ना पाहून 'राजकुमार' झाला विचलित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 09:16 PM2021-11-10T21:16:25+5:302021-11-10T21:17:40+5:30
Nagpur News बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील एन्क्लोजरमध्ये बुधवारी प्रथमच पांढऱ्या हरिणांना सोडण्यात आले. या नव्या पाहुण्यांना पाहून ‘राजकुमार’ विचलित झाला, जाळीजवळ पोहोचून पंजाने झडपा द्यायला लागला.
नागपूर : येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील एन्क्लोजरमध्ये बुधवारी प्रथमच पांढऱ्या हरिणांना सोडण्यात आले. या नव्या पाहुण्यांना पाहून ‘राजकुमार’ विचलित झाला, जाळीजवळ पोहोचून पंजाने झडपा द्यायला लागला. त्याचा हा पवित्रा पाहून पर्यटकांना नवा रोमांचकारी अनुभव या निमित्ताने आला.
येथील आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात महिनाभरापूर्वी दिल्लीवरून पांढरी हरणे आणण्यात आली आहेत. कोविड नियमानुसार त्यांना प्रथम विलगीकरणात ठेवण्यात आले होते. विलगीकरणाचा काळ संपल्याने वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बुधवारी सकाळी त्यांना येथील खुल्या एन्क्लोजरमध्ये सोडण्यात आले. त्यांच्या एन्कोलोजरलगतच राजकुमार या वाघाचा एन्कोलोजर आहे. लगतच्या हिरवळीवर बागडत असलेल्या सुंदर पांढऱ्या हरणांकडे राजकुमारचेही लक्ष वेधले गेले. त्याने आपल्या एन्कोलोजरच्या सीमेवर धाव घेऊन हरिणांवर झडप घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाळ्यांमुळे तो सफल झाला नाही. अखेर त्यावर पंजाचे तडाखे देत तो आपला संताप व्यक्त करत राहिला. कँटरमधून पर्यटनाचा आनंद घेणाऱ्यांसाठी अर्थातच हे दृश्य नवलाईचे होते.
दिल्लीहून मागील काही दिवसांपूर्वी गोरेवाड्यात आणलेल्या प्राण्यांमध्ये २० पांढऱ्या हरिणांचा तसेच दोन काळविट आणि भेकरांचा समावेश आहे. गुलाबी थंडीच्या या दिवसांमध्ये पर्यटकांची संख्याही वाढायला लागली आहे. येथील एन्कोलोजरमध्ये असलेले प्राणीही या दिवसात पर्यटकांना हमखास दर्शन देत आहेत. अस्वल, नीलगाय, मोर, ठिबक्यांचे हरीण या प्राण्यांचे दर्शन होत आहे. एवढेच नाही तर, कोवळे ऊन खाण्यासाठी झाडाच्या फांदीवर बसलेले बिबटेही पर्यटकांना दर्शन देत आहेत.