मेडिकलच्या सिटीस्कॅनला सील ठोकण्याचा इशारा
By admin | Published: May 15, 2015 02:45 AM2015-05-15T02:45:28+5:302015-05-15T02:45:28+5:30
मेडिकलमधील रेडिओलॉजी विभागाला नवी दिल्लीतील अणुऊर्जा नियामक मंडळाच्या चमूने अकस्मात भेट देऊन
ंनागपूर : मेडिकलमधील रेडिओलॉजी विभागाला नवी दिल्लीतील अणुऊर्जा नियामक मंडळाच्या चमूने अकस्मात भेट देऊन पाहणी केली असता मेडिकलकडे अणुवापराचा परवानाच नसल्याची बाब निदर्शनास आली. यावर नियामक मंडळाच्या चमूने विभागाला नोटीस जारी केली आहे. येत्या काही दिवसांत परवान्यासंदर्भातील प्रक्रिया त्वरित पूर्ण न केल्यास एक्स-रे आणि सिटीस्कॅन मशीन सील करण्याचा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.
एक्स-रे आणि सिटीस्कॅनमध्ये अणुचा वापर होतो. अणु उत्सर्जनाचे शरीरावर घातक आणि दूरगामी परिणाम होत असतात. त्यामुळे अणुचे विकिरण होत असताना अत्यंत काटेकोरपणे काळजी घ्यावी लागते. म्हणूनच अणुच्या वापरावर केंद्रीय अणुऊर्जा नियामक मंडळाची देखरेख असते. कोणत्या निदानासाठी किती प्रमाणात अणुचे उत्सर्जन करावे, यासाठी नियम घालून दिले आहेत. परिणामी ही उपकरणे हाताळत असताना अणुऊर्जा नियामक मंडळाची परवानगी असणे सक्तीचे असते.
हा परवाना नसणे म्हणजे केंद्रीय अणुऊर्जा कायदाच्या नियमांचे उल्लंघन आहे. मेडिकलच्या रेडिओथेरेपी विभागाजवळ हा परवानाच नसल्याची बाब गुरुवारी अणुऊर्जा नियामक मंडळाच्या निदर्शनास आली.
त्यांनी लगेच अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांची भेट घेऊन याची माहिती दिली. तसेच विभागाला नोटीस बजावत यासंदर्भातील कागदपत्रे त्वरित सादर करण्याची व रीतसर परवानगी न घेतल्यास सील ठोकण्याचा इशाराही दिला.(प्रतिनिधी)