कॅम्पस ड्राईव्हमध्ये १३३ विद्यार्थ्यांची निवड, विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण विभागाचा पुढाकार
By आनंद डेकाटे | Published: April 19, 2023 04:45 PM2023-04-19T16:45:15+5:302023-04-19T16:46:47+5:30
विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून रोजगार मेळाव्याचे आयोजन
नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कॅम्पस इंटरव्यूमध्ये एकूण तब्बल १३३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हेक्सावेअर कंपनीत ४० तर तेली परफॉर्मन्स कंपनीत ९३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. मिहान येथील हेक्सावेअर आणि टेलीपरफॉर्मन्स या दोन कंपनीकडून विद्यापीठ दीक्षांत सभागृहात विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून रोजगार मेळावे आयोजित केले जात आहे. विद्यार्थ्यांचा देखील या रोजगार मेळाव्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मिहान येथील हेक्सावेअर या कंपनीकडून एक्झिक्यूटिव्ह व सीनियर एक्झिक्यूटिव्ह या पदाकरिता मुलाखती घेण्यात आल्या. या कंपनीच्या मुलाखतीकरिता १४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकच दिवस आयोजित या मुलाखतीत तब्बल ४० विद्यार्थ्यांची हेक्सावेअर या कंपनीत निवड करण्यात आली. ४ विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक लाखांपासून ४ लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
टेलीपरफॉर्मन्स या कंपनीकडून कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. कस्टमर सर्विस असोसिएट्स ज्या पदाकरिता पहिल्या दिवशी १५० तर दुसऱ्या दिवशी ७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मुलाखतीनंतर पहिल्या दिवशी ६६ तर दुसऱ्या दिवशी २७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक १.८ ते ४ लाख रुपयांचे पॅकेज या पदाकरिता दिले जाणार आहे.
- कुलगुरू व प्र-कुलगुरूंची भेट
दीक्षांत सभागृह येथे सुरू असलेल्या कॅम्पस इंटरव्यूला माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी भेट दिली. रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व प्र -कुलगुरू डॉ संजय दुधे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. या रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांनी प्रयत्न केले.