हवाई सफरीसाठी सेंट पॉल स्कूल नागपूरच्या सहिद रबडेची निवड
By Admin | Published: June 24, 2015 03:12 AM2015-06-24T03:12:13+5:302015-06-24T03:12:13+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेत सहभागी झालेल्या नागपूर येथील सेंट पॉल स्कूलचा विद्यार्थी सहिद नंदू रबडे याची....
२५ जूनला दिल्लीला जाणार : सहिदवर अभिनंदनाचा वर्षाव
नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या ‘संस्काराचे मोती’ स्पर्धेत सहभागी झालेल्या नागपूर येथील सेंट पॉल स्कूलचा विद्यार्थी सहिद नंदू रबडे याची नागपूर-दिल्ली-नागपूर हवाई सफरीसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत सहिद नागपुरातून भाग्यवान विजेता ठरला आहे. लोकमत दैनिकातर्फे सहिदला विमानाने दिल्लीला जाण्याची संधी मिळाल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संस्काराचे मोती स्पर्धेत सहिदची निवड झाल्याने सेंट पॉल स्कूलचे संचालक डॉ. राजाभाऊ टांकसाळे, अध्यक्षा मंदाताई टांकसाळे, प्राचार्य देवांगना पुंडे, मुख्याध्यापिका संगीता पिरके, सुपरवायझर किरणबाला विल्फ्रेड, संपूर्ण शिक्षक, शिक्षिका व वर्गमित्रांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लोकमत वृत्तपत्र समूह सातत्याने प्रयत्न करीत आहे. दरवर्षी संस्काराचे मोती ही ज्ञानवर्धक स्पर्धा आयोजित केली जाते. २०१४-१५ मध्ये १ जुलै ते ११ आॅक्टोबर या १०० दिवसांच्या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेत विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यातून एका भाग्यवान विजेत्याची हवाई सफरसाठी निवड करण्यात आली आहे. नागपुरातून सेंट पॉल स्कूलचा सहिद रबडे याची निवड झाली आहे. सहिद येत्या २५ जूनला नागपुरातून दिल्लीकडे रवाना होणार आहे. विदर्भातून भाग्यवान ठरलेले सर्व विद्यार्थी राष्ट्रपती भवनाला भेट देणार आहे. लोकमतच्या या उपक्रमाबद्दल सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टांकसाळे यांनी अभिनंदन केले. (प्रतिनिधी)