स्वत: वरील विश्वासच तुम्हाला मोठे करतो : वर्तिका पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 01:02 AM2019-04-28T01:02:42+5:302019-04-28T01:04:36+5:30
महिलांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्या स्वत: स्वत:ची दिशा ठरवू शकतात. गरज आहे केवळ स्वत:वरील विश्वासाची. हा विश्वासच तुम्हाला पेरणा देतो आणि तुमची चिकाटी, परिश्रमाला मोठे करतो, असे मत ‘मिसेस इंडिया वेस्ट-एम्प्रेस ऑफ वेस्ट’चा किताब जिंकणाऱ्या नागपूरचा डॉ. वर्तिका पाटील यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्या स्वत: स्वत:ची दिशा ठरवू शकतात. गरज आहे केवळ स्वत:वरील विश्वासाची. हा विश्वासच तुम्हाला पेरणा देतो आणि तुमची चिकाटी, परिश्रमाला मोठे करतो, असे मत ‘मिसेस इंडिया वेस्ट-एम्प्रेस ऑफ वेस्ट’चा किताब जिंकणाऱ्या नागपूरचा डॉ. वर्तिका पाटील यांनी व्यक्त केले. सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या कसोटीवर स्वत:ला सिद्ध करीत त्यांनी हा पुरस्कार खेचून आणला
पुरस्कार जिंकल्यानंतर डॉ. पाटील यांनी शनिवारी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, आता पुढचे लक्ष्य ‘मिसेस वर्ल्ड’ आहे. ही स्पर्धा डिसेंबरमध्ये होणार आहे. त्यासाठी तयारी करायची आहे.
मूळच्या नागपूरकर असलेल्या डॉ. पाटील यांची ‘मिसेस इंडिया वेस्ट’ स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रासह, गुजरात आणि गोवा मिळून ३२ स्पर्धक सहभागी झाले होते. सौंदर्य स्पर्धेचा मुकुट पटकावणारच असा प्रचंड आत्मविश्वास घेऊन त्या स्पर्धेत उतरल्या. त्यांच्या पाठीशी ‘मिस मेडिको’, ‘मिस संजीवनी’, ‘मिसेस महाराष्ट्र’ आदी स्पर्धेतील विजेतेपदाचा अनुभव होता. पुण्यात झालेल्या अतिशय भव्य आणि दिव्य ग्लॅमरस वातावरणात ‘मिसेस इंडिया वेस्ट’ ही स्पर्धा रंगली. वेगवेगळ्या कसोट्यांवर डॉ. पाटील यांनी स्वत:ला सिद्ध केले. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी विविध फेऱ्यांत त्यांनी चुणूक दाखवली. मुलाखतीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी परीक्षकांची मने जिंकली. त्यामध्ये सर्वाधिक गुण मिळाले.
डॉ. पाटील म्हणाल्या, ‘दिवा पेजेंट’च्यावतीने आयोजित या स्पर्धेसाठी सलग पाच महिने कठोर परिश्रम उपसले. यात पती, चार वर्षाची मुलगी आणि संपूर्ण कुटुंबाकडून मोठे सहकार्य मिळाले. पती डॉ. हिमांशु पाटील हे एन्डोक्रायनोलॉजिस्ट यांची बरीच मदत झाली. शेवटच्या फेरीपर्यंत स्वत:वरील विश्वास ढळू दिला नाही. प्रत्येक फेरीत सर्वांची मने जिंकली. पाठीशी असलेल्या इतर स्पर्धेचा स्वत:चा अनुभवही इतर स्पर्धकांना देऊन मदतही केली. संपूर्ण स्पर्धेत स्वत:ची वेगळी छाप पाडली. यामुळेच ‘मिसेस इंडिया वेस्ट’चा मुकुट पटकाविता आला, असेही त्या म्हणाल्या. ‘मिसेस इंडिया’ या स्पर्धेद्वारे स्वत:ची क्षमता सिद्ध करण्यास उत्सुक असलेल्या विवाहित स्त्रियांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ज्याद्वारे त्यांना त्यांच्या प्रतिभेला प्रयत्नांची जोड देत बहर आणता येईल, असेही सांगितले.
चर्चेदरम्यान कार्ल मस्करेन्हास, अंजना मस्करेन्हास, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. अरुणा पाटील, पौर्णिमा पाटील व डॉ. हिमांशु पाटील उपस्थित होते.