आत्मदहन प्रकरण : दगाबाजीतूनही गुप्ताने कमावली कोट्यवधीची माया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 08:47 PM2020-06-12T20:47:06+5:302020-06-12T20:52:16+5:30
रेल्वे कर्मचाऱ्याला आपल्याच घरापुढे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाºया रविशंकर गुप्ता याने शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकानांची विक्री करून कोट्यवधी रुपयांची माया दगाबाजीने कमावली आहे. पीडितांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुप्ता आणि त्याचा साथीदार संदीप पांडे याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. गुप्ताच्या अटकेनंतर त्याच्या संबंधित पीडित लोक पुढे येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे कर्मचाऱ्याला आपल्याच घरापुढे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाºया रविशंकर गुप्ता याने शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकानांची विक्री करून कोट्यवधी रुपयांची माया दगाबाजीने कमावली आहे. पीडितांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुप्ता आणि त्याचा साथीदार संदीप पांडे याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. गुप्ताच्या अटकेनंतर त्याच्या संबंधित पीडित लोक पुढे येत आहेत.
८ जून रोजी दुपारी रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश कनौजिया (६४) यांनी पार्वतीनगर येथील गुप्ताच्या घरापुढे स्वत:ला पेटवून घेतले होते. उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपूर्व बयानाच्या आधारे अजनी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदवून गुप्ताला अटक केली आहे. कनौजिया यांनी मुलाच्या नावावर गुप्ताकडून त्याच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये दुकान विकत घेतले. गुप्ताला ६ लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आले होते. त्यानंतर दुकानाचे निर्माण कार्य अवैध असल्याने हा सौदा रद्द करून अनामत रक्कम परत मागण्यात आली होती. त्यातून गुप्ताने केवळ दोन लाख रुपयेच परत केले. ऊर्वरित चार लाख रुपये परत करण्याऐवजी कनौजिया यांना गुंडांच्या माध्यमातून धमकावण्यात येत होते. याला कंटाळून कनौजिया यांनी आत्महत्या केली.
अशाच प्रकारे गुप्ता याने फुल विक्रेता विनायक बोरकरसह सात लोकांना फसवले आहे. ओंकारनगर येथील ३३०० वर्गफुटाच्या जागेला स्वत:च्या मालकीची सांगून त्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याची तयारी दर्शवून ही फसवणूक करण्यात आली आहे. यात या सर्वांकडून त्याने एक कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम घेतली. याच जागेवर दोन माळ्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर नासुप्रने ही इमारत अवैध निर्माणकार्य म्हणत जमीनदोस्त केली. त्यानंतर फसवणूक होत असल्याची बोरकरसह अन्य लोकांना जाणीव होताच त्यांनी गुप्ताकडे आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली.
कनौजिया यांच्याप्रमाणेच गुप्ताने त्यांना टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. गुंड आणि पोलिसांच्या मदतीने तो धमकावत असल्याने पीडित शांत बसले होते. मात्र, कनौजिया प्रकरणात गुप्ताला अटक होताच त्या सर्वांनी गुरुवारी तक्रार नोंदवली आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार गुप्ता अशाच प्रकारे फसवणूक करून मालामाल झाला आहे. अनेक पीडित आता पुढे यायला लागले आहेत. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास झाल्यास गुप्ताचे अन्य साथीदारही उजेडात येण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या सक्रियतेमुळे अनेक पीडित अजनी ठाण्यात येत आहेत.
होईल मोठ्या रॅकेट्सचा पर्दाफाश
अजनी ठाण्याच्या परिसरात अनेक भूखंड माफिया सक्रिय आहेत. गुप्ता प्रमाणेच ते दगाबाजी किंवा जमीन बळकावण्याच्या व्यवसायात लिप्त आहेत. त्यांनी अनेक ‘डमी’ लोकांना उभे करून जागा बळकावल्या आहेत. नेता आणि प्रतिष्ठित लोकांशी संबंध असल्याचे सांगून ते पीडितांना प्रभावित करत आहेत. गुप्ता प्रकरणाच्या मुळाशी गेल्यावर अशा अनेक रॅकेट्सचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आर्थिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचा तपास सुरू आहे.
स्थानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणात स्थानिक संस्थांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गुप्ताने मुख्या मार्गावर शॉपिंग कॉम्प्लेक्सचे निर्माण केले होते. निर्माण कार्य पूर्ण झाल्यावर स्थानिक संस्थांचे डोळे उघडले. त्यानंतर हे निर्माण कार्य तोडण्यात आले. परंतु, सुरुवातीपासूनच संस्थांची सक्रियता असती तर पीडित पिळले गेले नसते.