प्रजासत्ताकदिनी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन
By गणेश हुड | Published: January 19, 2024 06:20 PM2024-01-19T18:20:02+5:302024-01-19T18:20:13+5:30
७ व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी देताना प्रामुख्याने लिपीक वर्गीय संवर्गासह व इतर संवर्गाच्या कर्मचाऱ्यांवर बक्षी समितीने अन्याय केला आहे.
नागपूर : राज्यभरातील जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत लिपीकवर्गीय व अन्य संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावती दूर कराव्यात. तसेच शासनाकडे प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी मुंबईतील ग्रामविकास विभागापुढे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार प्रणित) यांच्या नेतृत्वात आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे.
७ व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी देताना प्रामुख्याने लिपीक वर्गीय संवर्गासह व इतर संवर्गाच्या कर्मचाऱ्यांवर बक्षी समितीने अन्याय केला आहे. त्यानंतर याच समितीच्या खंड २ चा अहवाल बाहेर आल्यावर त्यातही निराशाच हाती आली आहे. राज्य शासनाच्या काही विभागातील लिपीकांच्या वेतनश्रेणीत सुधारणा केल्या. त्यात ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णय ७ नोव्हेंबर २०२३ नुसार व राज्य शासनाच्या एका विभागातील लिपीकांच्याच वेतन श्रेणीत गत आठवड्यात सुधारीत शासन निर्णय पारित करण्यात आला.
तसेच शासनाने मंत्रालयातील लिपीक, टंकलेखन या संवर्गाच्या वेतनश्रेणीत एकमुश्त ५ हजारांची दरमहा वेतनवाढ केली. परंतु गेल्या १५-२० वर्षांत अनेकदा आंदोलन व शासनाकडे निवेदन सादर करुनही जि.प. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाही. यामुळेच पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेचे राज्याध्यक्ष बलराज मगर यांच्या नेतृत्वात हे आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावर ध्वजारोहनानंतर पालकमंत्र्यांकडे या आंदोलनाबाबत निवेदन देऊन शासनस्तरावर निर्णय घेण्यासाठी व शिफारशीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य सहचिटणीस अरविंद अंतुरकर यांनी दिली. आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार संघटनेचे कार्याध्यक्ष किशोर भिवगडे, कोषाध्यक्ष राहुल देशमुख, सुजीत अढाऊ, विजय भुरेवार, सुभाष पडोळे, अक्षय मंगरुळकर आदींनी व्यक्त केला आहे.