जिल्हा परिषदेत शिवसेनेकडून स्वबळाचा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:12 AM2021-09-17T04:12:30+5:302021-09-17T04:12:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शिवसेनेेने जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकांमध्ये प्रत्येक जागेवर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेनेेने जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकांमध्ये प्रत्येक जागेवर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या बैठकीत याबाबत खासदार कृपाल तुमाने यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यामुळे या निवडणुकांत महाविकास आघाडी तुटल्यातच जमा झाल्याचे चित्र आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागांवर पोटनिवडणूका होणार आहेत. यासाठी जून महिन्यातच नामांकन प्रक्रिया पूर्ण जाली होती. जिल्हा परिषदेसाठी १०३ व पंचायत समितीसाठी १६० उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले. कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेससह आघाडी केली आहे. एक जागा शेकापसाठी सोडण्यात आली आहे. शिवसेनेने आघाडी न करता १२ सर्कल्समध्ये उमेदवार उभा केला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला आपल्या गोटात घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करून उमेदवार कायम राहतील, असे संकेत दिले आहेत. शिवसेनेने गुरुवारच्या बैठकीत पोटनिवडणुकीबाबत नियोजन निश्चित केले. शिवसेना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असला तरी जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळी स्वबळावर लढत दिली होती. पोटनिवडणुकीतदेखील असेच केले जात असल्याचे तुमाने यांनी सांगितले. बैठकीला जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार व राजेंद्र हरणे, महिला सेनेच्या अंजुषा बोधनकर प्रामुख्याने उपस्थित होते.