'स्वा. सावरकर प्रखर देशभक्तीचे प्रेरणास्रोत'; मीरा खडक्कार तेजस्विनी महिला गौरव पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2023 09:34 PM2023-05-29T21:34:37+5:302023-05-29T21:36:39+5:30

Nagpur News स्वा. विनायक दामोदर सावरकर व त्यांचे कुटुंब प्रखर देशभक्तीचे प्रेरणास्रोत आहे. त्यांच्यामुळेच मी देश व समाजाकरिता झटण्यासाठी प्रोत्साहित होते, असे कुटुंब न्यायालयाच्या सेवानिवृत्त प्रधान न्यायाधीश व सामाजिक कार्यकर्त्या मीरा खडक्कार यांनी सांगितले.

Self Savarkar is the source of intense patriotism | 'स्वा. सावरकर प्रखर देशभक्तीचे प्रेरणास्रोत'; मीरा खडक्कार तेजस्विनी महिला गौरव पुरस्काराने सन्मानित

'स्वा. सावरकर प्रखर देशभक्तीचे प्रेरणास्रोत'; मीरा खडक्कार तेजस्विनी महिला गौरव पुरस्काराने सन्मानित

googlenewsNext

 

नागपूर : स्वा. विनायक दामोदर सावरकर व त्यांचे कुटुंब प्रखर देशभक्तीचे प्रेरणास्रोत आहे. त्यांच्यामुळेच मी देश व समाजाकरिता झटण्यासाठी प्रोत्साहित होते, असे कुटुंब न्यायालयाच्या सेवानिवृत्त प्रधान न्यायाधीश व सामाजिक कार्यकर्त्या मीरा खडक्कार यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या वतीने सोमवारी मीरा खडक्कार यांना तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार तर, समाजसेवक व साहित्यिक दाम्पत्य डॉ. तीर्थराज कापगते आणि संगिता केणे-कापगते यांना स्वा. सावरकर सामाजिक अभिसरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी खडक्कार बोलत होत्या. हा कार्यक्रम झांशी राणी चौकातील हिंदी मोर भवनात पार पडला. सावरकर कुटुंबाने देशभक्तीचे व्रत घेतले होते. त्यामुळे त्यांना आयुष्यभर उपेक्षा व उपहास सहन करावा लागला. परंतु, त्यांनी धेय्यापासून कधीच माघार घेतली नाही. आपल्यापेक्षा अधिक महत्त्वाचा देश आहे अशी त्यांची भावना होती, असेही खडक्कार म्हणाल्या.

तीर्थराज कापगते यांनी वर्तमान काळात जाती व धर्मभेदाच्या भिंती बळकट होत असल्यामुळे चिंता व्यक्त करून समाजात समानतेचा वारा वाहण्याची गरज असल्याचे नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंतरजातीय विवाहांमुळे भेदाभेद नष्ट होऊ शकतो असे म्हटले होते. तसेच, स्वा. सावरकर यांनी आयुष्यभर जातीभेदाचा विरोध केला होता, याकडेदेखील त्यांनी लक्ष वेधले.

कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, तर कार्याध्यक्ष मिलिंद कानडे व शिरीष दामले व्यासपीठावर उपस्थित होते. अनिल देव यांनी प्रास्ताविक केले. दिनेश खुरगे यांनी सूत्रसंचालन केले.

समितीला एक लाख रुपये देणगी

राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या रेखाताई पार्डीकर यांनी समितीला अभिनव भारत भवन बांधण्यासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली. त्यांच्या या योगदानाचे कौतुक करण्यात आले.

Web Title: Self Savarkar is the source of intense patriotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.