कापूस खरेदीसाठी नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आपापल्या घरी बसून आत्मक्लेश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 04:36 PM2020-05-15T16:36:18+5:302020-05-15T16:38:34+5:30

सीसीआय आणि कापूण पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी केंद्र वाढवून शेतकऱ्यांकडील कापूस सरसकट व शेवटच्या बोंडापर्यंत खरेदी करावा, या मागणीसाठी काटोल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन केले.

Self-torture agitation of farmers in Nagpur district for purchase of cotton | कापूस खरेदीसाठी नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आपापल्या घरी बसून आत्मक्लेश आंदोलन

कापूस खरेदीसाठी नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आपापल्या घरी बसून आत्मक्लेश आंदोलन

Next
ठळक मुद्दे आंदोलनात शेतकऱ्यांचा समावेशकेंद्र वाढविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीसीआय आणि कापूण पणन महासंघाने राज्यात कापूस खरेदी केंद्र वाढवून शेतकऱ्यांकडील कापूस सरसकट व शेवटच्या बोंडापर्यंत खरेदी करावा, या मागणीसाठी काटोल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन केले. सदर आंदोलन संबंधित शेतकऱ्यांनी आपापल्या घरी दिवसभर उपवास करून केले.
नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात लॉकडाऊनमुळे कापूस खरेदीचा तिढा निर्माण झाला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नाही. शिवाय, संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करणे शक्य नाही. त्यामुळे अ‍ॅड. नीलेश हेलोंडे यांनी काटोल व नरखेड तालुक्यातील कापूस उत्पादकांना आपापल्या घरी बसून एक दिवसाचे अन्नदात्यासाठी आत्मक्लेश (उपवास) आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत काटोल, शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया, अ‍ॅड. नीलेश हेलोंडे, पुरुषोत्तम धोटे, धीरज मांदळे, प्रदीप उबाळे, विजय ठाकरे, भीमराव बरडे यांच्यासह नरखेड तालुक्यासह नागपूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील तसेच अमरावती, वर्धा, अकोला, बुलडाणा, नांदेड व परभणी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आपापल्या घरी बसून दिवसभर उपवास करीत या आंदोलनात सहभाग घेतला.
पावसाळा तोंडावर असल्याने शासनाने कापूस खरेदीबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा, खुल्या बाजारात कापसाला आधारभूत किमतीच्या तुलनेत प्रति क्विंटल १,१५० रुपये कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली असून, ही समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Self-torture agitation of farmers in Nagpur district for purchase of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.