नागपूरच्या झिरो माईलला बनविणार ‘सेल्फी पॉर्इंट’ : जयकुमार रावल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:35 AM2017-12-21T00:35:56+5:302017-12-21T00:40:01+5:30
शहरातील झिरो माईल हे ठिकाण देशाचे हृदयस्थळ आहे. या ठिकाणी अनेक लोक भेट देत असतात. त्यामुळे येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून १० लाख रुपये खर्च करून ‘सेल्फी पॉर्इंट’ तयार केले जाईल. त्यासाठी मी आजच निधी मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : शहरातील झिरो माईल हे ठिकाण देशाचे हृदयस्थळ आहे. या ठिकाणी अनेक लोक भेट देत असतात. त्यामुळे येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून १० लाख रुपये खर्च करून ‘सेल्फी पॉर्इंट’ तयार केले जाईल. त्यासाठी मी आजच निधी मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व लोकमाता सुमतीताई सुकळीकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात आयोजित पाच दिवसीय फूड फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, महापौर नंदा जिचकार, एमटीडीसीचे प्रधान सचिव नितीन गद्रे, व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, महाव्यवस्थापक स्वाती काळे, उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल उपस्थित होते. या पाहुण्यांच्या हस्ते बोदलकसा पर्यटन प्रकल्प, वणी येथील माईन टुरिझमचे लोकार्पण करण्यात आले. मदन येरावार म्हणाले, देशात व विदेशातही अनेक राज्यांनी पर्यटनाच्या आधारे आपली अर्थव्यवस्था समृद्ध केली आहे. पर्यटनात आर्थिक चित्र बदलण्याची क्षमता आहे. एमटीडीसीचे विश्रामगृह हे पर्यटकांची पहिली पसंती असावी, असा आमचा प्रयत्न आहे. महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, हा उपक्रम अभिनंदनीय आहे. यासाठी नागपूर मनपातर्फे आवश्यक ती सर्व मदत आम्ही करू. प्रास्ताविक डॉ. उदय बोधनकर, सुमतीताई सुकळीकर स्मृती प्रतिष्ठानची ओळख ज्योत्स्ना पंडित तर संचालन वृशाली देशपांडे यांनी केले. उद्घाटनानंतर सुरमयी शाम या गायक सावनी रवींद्र आणि कलाकारांचा संगीतमय कार्यक्रम सादर झाला. २५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
आॅरेंज सिटीचे जागतिक ब्रॅन्डिंग
नागपुरात आयोजित वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलने आॅरेंज सिटीचे जागतिक ब्रॅन्डिंग केले. येथील संत्रा उत्पादक आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासोबतच पर्यटनाला वाव मिळावा म्हणून आम्ही हा फेस्टिव्हल आयोजित केला होता. तो प्रचंड यशस्वी झाला. त्याचे सकारात्मक परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला दिसतील, असा विश्वासही पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.