‘सेल्फी’ स्वत:च्या उणिवाही दाखवतो
By admin | Published: October 25, 2015 02:48 AM2015-10-25T02:48:57+5:302015-10-25T02:48:57+5:30
सेल्फीचे सध्या फारच वेड आहे. पण सेल्फी हे नाटक मात्र केवळ एका छायाचित्रावर आधारित नसून संपूर्ण आयुष्याचे सिंहावलोकन करणारे आणि महिलांना विचार देणारे नाटक आहे.
सेल्फी नाटकाच्या पाच अभिनेत्रींशी लोकमत सखी मंच सदस्यांचा मनमोकळा संवाद
नागपूर : सेल्फीचे सध्या फारच वेड आहे. पण सेल्फी हे नाटक मात्र केवळ एका छायाचित्रावर आधारित नसून संपूर्ण आयुष्याचे सिंहावलोकन करणारे आणि महिलांना विचार देणारे नाटक आहे. मुळात आयुष्याच्या धावपळीत आपल्याला आवडते तसे जगायला मिळतच नाही. आपल्या कला, गुणांचा विसर पडतो आणि आपण परिस्थितीला शरण जातो. पण अनेकदा एखाद्या टप्प्यावर आपल्याच उणिवा आपल्याला कळतात आणि त्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न केल्यावर प्रगतीची नवी दालनेही खुली होऊ शकतात. त्यामुळेच नाटकातला सेल्फी स्वत:च्या सौंदर्यासह उणिवाही दाखवतो, असे मत या नाटकातील पाच नायिकांनी लोकमत सखी मंचच्या सदस्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.
लोकमत सखी मंचच्यावतीने सखी मंच सदस्यांना ‘सेल्फी’ नाटकातील कलावंतांशी संवाद साधण्याची संधी देण्यात आली. हा कार्यक्रम विष्णुजी की रसोई येथे शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यात अभिनेत्री सुकन्या कुळकर्णी, सोनाली पंडित, ऋतुजा देशमुख, शिल्पा नवलकर आणि पूर्वा गोखले यांनी सखींशी संवाद साधला. याप्रसंगी सखींनी अभिनेत्रींना त्यांचे करियर, खाजगी जीवन, त्यांचे चित्रपट आणि मालिका आदींबाबत माहिती विचारली. या सर्व अभिनेत्री शनिवारी ‘सेल्फी’ या नाटकाच्या प्रयोगासाठी नागपुरात आल्या होत्या. डॉ. देशपांडे सभागृहात या नाटकाचे तीन प्रयोग आयोजित करण्यात आले आहे. नाटकाचे निर्माता आणि दिग्दर्शक अजित भुरे यांनीही यावेळी सखींशी संवाद साधला.
सेल्फी अर्थात स्वत:चा विचार करणे. नाटकात साधारण पस्तीशीच्या वयोगटातील एकमेकींना न ओळखणाऱ्या महिला काही कारणाने एकत्रित येतात आणि त्यांच्यात संवाद सुरू होतो.
या संवादातून प्रत्येकीच्या आयुष्यातील उणिवा समोर येतात आणि त्याची उत्तरेही नकळतपणे मिळतात. याप्रसंगी सखींचे स्वागत प्रफुल्ल मनोहर यांनी केले. संचालन नेहा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)