खतांची विक्री ई-पॉस मशीनने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:10 AM2019-05-20T11:10:10+5:302019-05-20T11:10:34+5:30
जर कृषी सेवा केंद्राकडून आदेशाचे उल्लंघन करीत खतांची विक्री केली, तर अशा केंद्राचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील कृषी केंद्राकडून खताची विक्री ही ई-पॉस मशीनद्वारे होणे बंधनकारक आहे. जर कृषी सेवा केंद्राकडून आदेशाचे उल्लंघन करीत खतांची विक्री केली, तर अशा केंद्राचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी दिला आहे.
रासायनिक खताच्या साठेबाजीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात ई-पॉस (पॉर्इंट आॅफ सेल) मशीनचा वापर अनिवार्य करण्यात आलेला आहे. पॉस मशीनद्वारे शासनाचे अनुदान थेट कंपनीला मिळणार असून खरेदीच्या नोंदी आधार कार्डशी संलग्न होणार आहेत. परिणामी रासायनिक खतांचा होणारा गैरव्यवहार बंद होईल, अशी अपेक्षा आहे. शिवाय या प्रणालीमुळे अनुदानित खतांचा वापर औद्योगिक क्षेत्रासाठी करण्यावरही मर्यादा येईल. सोबतच दुसऱ्या व्यक्तीच्या नावे पावती करून परस्पर खतांची विक्री करण्यावरही नियंत्रण येणार आहे. तसेच उपलब्धतेच्या दृष्टिकोनातून आकडेवारी लक्षात यावी, यासाठी ई-पॉस मशीनद्वारे खतांची विक्री करणे गरजेचे आहे, तसा शासन निर्णयही आहे.
जिल्ह्यात एकूण ९३० वर नोंदणीकृत कृषी सेवा केंद्र आहेत. सर्व केंद्रांना ई-पॉस मशीन वितरण करण्यात आल्या आहे. पॉस मशीनद्वारेच खतांची विक्री करणे गरजेचे असल्याच्या सूचना कृषी आयुक्त व कृषी संचालकांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कृषी केंद्रातून खतांची विक्री ई-पॉस मशीनद्वारे न झाल्यास केंद्रांचा परवाना रद्द करण्यात येणार असा इशारा देशमुख यांनी सर्व केंद्र चालकांना दिला आहे.