खतांचा स्टॉक जुन्या किंमतीत विका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:08 AM2021-05-22T04:08:35+5:302021-05-22T04:08:35+5:30
रामटेक : रामटेक तालुक्यात कृषी सेवा केंद्राकडून जास्त दराने खताची विक्रीची शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने अनेक सेवा केंद्राची ...
रामटेक : रामटेक तालुक्यात कृषी सेवा केंद्राकडून जास्त दराने खताची विक्रीची शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने अनेक सेवा केंद्राची पाहणी केली. तीत खतांचा किती स्टाक शिल्लक आहे याची माहिती घेतली. तसेच जो काही स्टॉक शिल्लक आहे तो जुन्याच दराने विकण्याचे आदेश दिले. खतांच्या अनेक कंपन्यांनी रासायनिक खताचा किंमतीत ३५ टक्के वाढ केल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. कृषी सेवा केंद्रातून रासायनिक खताची विक्री नवीन भावाने करण्याची शक्यता होती. त्यामुळे कृषी अधिकारी स्वप्नील माने यांनी अनेक कृषी सेवा केंद्राची पाहणी केली. गुरुवारी काचुरवाही येथील ओम साई सेवा केंद्राची पाहणी करण्यात आली. तिथे उपलब्ध खताची माहिती घेण्यात आली. तसेच हा माल जुन्या किंमतीत विक्री करण्याचे आदेश दिले. रामटेक तालुक्यात ७ मे २०२१ पर्यंत रासायनिक खत युरीया १२५९ मे.टन, डीएपी २३९.७६ मे.टन, एमओपी ८८.०६ मे.टन, एसएसपी १२१० मे.टन, सिटी कॅम्प १० मे.टन, कॉम्पेक्स १८४९.३५ मे.टन कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी रासायनिक खताची खरेदी करायची असल्यास सेवा केंद्रावर जुन्या किंमतीत खते खरेदी करावी. कृषी सेवा केंद्रावर जास्त दर आकारण्यात येत असेल तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी अधिकारी स्वप्नील माने यांनी केले आहे.