नागपुरातून चोरी झालेल्या मोबाईल्सची बांगलादेशमध्ये विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2022 08:22 PM2022-09-15T20:22:21+5:302022-09-15T20:23:35+5:30

Nagpur News नागपुरसह देशाच्या विविध शहरांमध्ये मोबाईल चोरी करून त्यांची झारखंड-बिहारमार्गे बांगलादेशमध्ये विक्री करणाऱ्या ‘रॅकेट’चा भंडाफोड करण्यात आला आहे.

Selling mobiles stolen from Nagpur in Bangladesh | नागपुरातून चोरी झालेल्या मोबाईल्सची बांगलादेशमध्ये विक्री

नागपुरातून चोरी झालेल्या मोबाईल्सची बांगलादेशमध्ये विक्री

Next
ठळक मुद्देआंतरराज्यीय टोळीतील सहा आरोपींना अटक १६ लाख किंमतीचे ७२ मोबाईल जप्त

योगेश पांडे 
नागपूर : नागपुरसह देशाच्या विविध शहरांमध्ये मोबाईल चोरी करून त्यांची झारखंड-बिहारमार्गे बांगलादेशमध्ये विक्री करणाऱ्या ‘रॅकेट’चा भंडाफोड करण्यात आला आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने आंतरराज्यीय टोळीतील सहा आरोपींना अटक केली असून आरोपी बिहार व झारखंड राज्यातील आहेत.

अल्पवयीन मुलांच्या मदतीने ही टोळी गर्दीत शिरून महागडे फोन चोरी करते. त्यांच्याकडून १६ लाख रुपये किंमतीचे ७२ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. झारखंडच्या साहिबगंज येथील मो.जाफर मो.इकाईल (२२), मो.इर्शाद नौशाद अन्सारी (२३), मो.अशफाक शेख आझाद (२३) तसेच मणिहारी, बिहार येथील शेख नसीम शेख सकीम (२०), मो.अरबाज मो.मन्नान खान व एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.

नुकताच सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक महागडा फोन चोरी गेला होता. गुन्हे शाखेचे युनिट २ या प्रकरणाचा तपास करत होते. त्यांना ‘इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स’च्या माध्यमातून कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौकाजवळ मोबाईल असल्याची माहिती मिळाली. तेथील एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना आरोपींना पकडण्यात आले.

पिवळी नदी परिसरात त्यांनी घर भाड्याने घेतले होते. तेथे छापा टाकला असता १६ लाख रुपये किमतीचे ७२ मोबाईल सापडले. ही टोळी चोरीचे मोबाईल बिहार-झारखंडला घेऊन जाते. तेथे चोरीचे मोबाईल विकत घेऊ इच्छिणारे त्यांच्यापर्यंत पोहोचतात व त्यांच्यामार्फत हे मोबाईल बांगलादेशात पाठवले जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली. उपायुक्त चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

Web Title: Selling mobiles stolen from Nagpur in Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.