शाळेतील झाडे विकून रक्कम हडपली
By admin | Published: July 28, 2014 01:29 AM2014-07-28T01:29:33+5:302014-07-28T01:29:33+5:30
शाळेच्या परिसरात असलेली मोठमोठी झाडे अवैधरीत्या तोडून लाकडांची परस्पर विक्री केल्याचा प्रकार कामठी तालुक्यातील वारेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत नुकताच उघडकीस आला.
मुख्याध्यापिकेचा प्रताप : वारेगावच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील प्रकार
सुदाम राखडे - कामठी
शाळेच्या परिसरात असलेली मोठमोठी झाडे अवैधरीत्या तोडून लाकडांची परस्पर विक्री केल्याचा प्रकार कामठी तालुक्यातील वारेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत नुकताच उघडकीस आला. या प्रकरणात मुख्याध्यापिका सुवर्णा सुनील भगत यांनी लाकूड विक्रीतून मिळालेली रक्कम हडप केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वारेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला कामठी येथील केशरताई भारुका यांनी त्यांच्या मालकीची ११ एकर जमीन १९६५ मध्ये दान दिली. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब केदार यांनी या जमिनीची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करून ही जमीन या शाळेच्या नावे करवून दिली. यातील काही जमिनीवर शाळेच्या प्रशस्त इमारतीचे बांधकाम करण्यात आले. काही जमीन मोकळी असल्याने त्यावर अंदाजे २५ वर्षांपूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी सागवान, बेहडा, रिठा यासह अन्य झाडांच्या रोपट्यांची लागवड करून त्यांचे संगोपनही केले. ही झाडे आता मोठी झाली. यातून वाचलेली काही जमीन स्थानिक शेतकऱ्यांना ५,५०० रुपयांप्रमाणे भाडेपट्टीने देण्यात आली.
वारेगाव येथील एका सूज्ञ नागरिकाने या गंभीर प्रकाराची तक्रार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडे केली. सुवर्णा भगत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या वृक्षतोडीबाबत विचारणा केली असता, त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. हा संपूर्ण प्रकार मुख्याध्यापिकेने तिच्या मनमर्जीने केला असून, झाडे तोडण्याची पूर्वसूचना स्थानिक ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती अथवा शिक्षण, वन व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना दिली नाही. त्यामुळे या प्रकरणाची निरपेक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.