दोन लाखांत महिलेची सौदी अरेबियात विक्री

By Admin | Published: May 4, 2017 02:10 AM2017-05-04T02:10:42+5:302017-05-04T02:10:42+5:30

चांगली नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेची दोन लाखांत सौदी अरेबियात विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

Selling woman in Saudi Arabia for two lakhs | दोन लाखांत महिलेची सौदी अरेबियात विक्री

दोन लाखांत महिलेची सौदी अरेबियात विक्री

googlenewsNext

वेतनाऐवजी मिळाल्या यातना : अत्याचार करण्याचा प्रयत्न
नागपूर : चांगली नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेची दोन लाखांत सौदी अरेबियात विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. चार महिने काम करून वेतनाऐवजी यातना मिळाल्याने या महिलेने तेथून पळ काढून भारतीय राजदुताच्या मदतीने नागपुरात पोहोचली. तिने सक्करदरा पोलिसात याबाबत तक्रार नोंदविली.
रईसा नवाब अली खान (४०) असे पीडित महिलेचे नाव आहे. रईसाची ओळख काही दिवसांपूर्वी बस प्रवासात अकिला बेगम हिच्याशी झाली. तिने रईसाला सौदी अरेबियात २० हजारांची नोकरी, राहणे आणि भोजन नि:शुल्क असल्याचे सांगितले. रईसाने तिच्यावर विश्वास ठेवला. औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ती रईसाला १५ आॅगस्ट २०१६ ला मुंबईला घेऊन गेली. तेथे तिने रईसाची भेट अब्दुल्ला याच्याशी करून दिली. त्याने अकिलाचे काम होईल, असा विश्वास दाखविला.
अकिलाने रईसाला कायम नोकरी मिळाल्याची बतावणी केली. दोघीही नागपुरात आल्या. ५ सप्टेबर २०१६ रोजी अकिला पुन्हा रईसाला घेऊन मुंबईला गेली. अब्दुल्लाने रईसाचे तिकीट जयपूरवरून असल्याचे सांगितल्याने दोघीही मुंबईवरून रेल्वेने जयपूरला पोहोचल्या. जयपूरला दोन दिवस हॉटेलमध्ये थांबल्यानंतर ९ सप्टेबरला तिने रईसाला जयपूर विमानतळावर सोडले.
जयपूरवरून रईसा शारजाहला पोहोचली. तेथून दुबई मार्गे रियादला गेली. तेथे आसमा नावाच्या महिलेचा भाऊ खालिद आणि हमद तिला घरी घेऊन गेले. तेथे तिला सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत काम करून मुलांना सांभाळावे लागत होते. महिनाभरानंतर तिने वेतनाची मागणी केली असता त्यांनी मुंबईच्या अब्दुल्लाकडून दोन लाखात तिला खरेदी केल्याचे सांगितले. आसमाने रईसाला दोन वर्षे काम करण्याचे किंवा दोन लाख देण्यास सांगितले. त्यानंतर आसमा आणि तिच्या भावांनी रईसाला मारहाण सुरू केली. रईसा पळून जाईल या शंकेमुळे त्यांनी तिचा पासपोर्ट आणि कागदपत्रे हिसकावली. आसमाचा भाऊ खालिदने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. आसमाकडे तीन महिने काम केल्यानंतर रईसा तेथून पळाली. एका दुकानदाराच्या साह्याने ती भारतीय राजदुताच्या कार्यालयामार्फत हैदराबादला पोहोचली.
तेथून विनातिकीट नागपुरात आली. याबाबत तिने सक्करदरा पोलिसात तक्रार नोंदविली असून त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याची तक्रार तिने पोलीस आयुक्तांना केली आहे. निर्भया सुरक्षा अभियान योजनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गुरव यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

आंतरराष्ट्रीय टोळीचा संबंध
अकिलाचा मानव तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याची शंका आहे. अकिलाने विदेशात नोकरीचे आमिष दाखवून यातना दिल्याचे प्रकरण यापूर्वीही उजेडात आले आहे. तीन वर्षापूर्वी मोटार मेकॅनिकचे काम करणाऱ्या तिघांना तिने फसविले होते. परंतु विदेशात गेल्यानंतर त्यांना अकिलाची कोणतीही मदत झाली नाही. बेरोजगारी आणि अधिक वेतन यामुळे अनेकजण सहज अकिलाच्या फसवणुकीला बळी पडतात.

अनेक महिलांची फसवणूक
रईसाच्या धर्तीवर शहरातील अनेक महिलांचीही अशीच विक्री झाल्याची माहिती आहे. त्या तेथून यातना भोगून परतल्या. यातील अनेक महिला एका विशिष्ट वर्गाच्या असून बदनामीच्या भीतीने त्या तक्रार दाखल करीत नाहीत. यामुळेच आरोपींचा खरा चेहरा समोर येऊ शकला नाही.

 

Web Title: Selling woman in Saudi Arabia for two lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.