समृद्धी महामार्गाच्या समानांतर धावणार सेमी हायस्पीड रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 11:19 PM2019-10-10T23:19:31+5:302019-10-10T23:21:37+5:30
सर्व काही व्यवस्थित राहिल्यास तीव्र गतीने सुरू असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या समानांतर ‘तेजस’च्या धर्तीवर नागपूर ते मुंबई सेमी हायस्पीड रेल्वेगाडी धावणार आहे. रेल्वे या संकल्पनेवर गांभीर्याने विचार करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्व काही व्यवस्थित राहिल्यास तीव्र गतीने सुरू असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या समानांतर ‘तेजस’च्या धर्तीवर नागपूर ते मुंबई सेमी हायस्पीड रेल्वेगाडी धावणार आहे. रेल्वे या संकल्पनेवर गांभीर्याने विचार करीत आहे. ही संकल्पना खरेच मूर्त रुपात आली तर महामार्ग आणि रेल्वे ट्रॅक यांच्यात भरधाव वेगाची स्पर्धा राहील.
समृद्धी महामार्ग राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत नागपूर ते मुंबई दरम्यान रस्ता मार्गाने लागणारा वेळ हा १५ तासाहून ८ तासावर येईल. समृद्धी महामार्ग प्रल्पासाठी जमीन अधिग्रहणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. प्रत्यक्ष रस्त्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. ७०१ किमीच्या या महामार्गाचे काम २०२१ मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. यात चार-चार लेनचे दोन मार्ग राहतील. आता रेल्वे विभाग यावर असा विचार करीत आहे की, या महामार्गाच्या समानांतर हायस्पीड रेल्वे चालवण्यात यावी. रेल्वेतील सूत्रांचा असा दावा आहे की, यासाठी जागेची उपलब्धता तपासून पाहिली जात आहे. वेगळा ट्रॅक टाकून हायस्पीड रेल्वे चालवण्याबाबत विचार केला जात आहे. या रेल्वे गाडीची गती प्रति तास २०० कि.मी. इतकी राहील. अशा परिस्थितीत नागपूर ते मुंबईचे अंतर चार तासात पूर्ण होईल. सूत्रांनुसार या रेल्वेचे संचालन लखनौते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या ‘तेजस’ रेल्वेच्या धर्तीवर खासगी तत्त्वावर चालवण्याचा विचार केला जात आहे. हा विचार सध्या प्राथमिक स्तरावर आहे. व्यावहारिक बाजू तपासल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जाते.
काय आहे तेजस?
तेजस एक्स्प्रेस लखनौ ते दिल्ली दरम्यान चालणारी हायस्पीड रेल्वेगाडी आहे. ही देशातील पहिली रेल्वे आहे ज्याचे संचालन खासगी हातात सोपवण्यात आले आहे. आठवड्यात सहा दिवस चालणाऱ्या या रेल्वेची जबाबदारी आयआरसीटीसीवर आहे. २०० कि.मी. प्रति सात याप्रमाणे धावणारी ही गाडी केवळ ६.१५ तासात आपला प्रवास पूर्ण करते. ही गाडी केवळ कानपूर आणि गाजियाबाद येथेच थांबते.