हा तर सेना-भाजपाचा ‘ड्रामा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 09:57 PM2018-04-16T21:57:00+5:302018-04-16T21:57:14+5:30
कोकणातील नाणार प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापले असताना काँग्रेसकडून सेना-भाजपवर प्रहार करण्यात आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात सेना-भाजपचे नेते ‘ड्रामा’ करत असून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. नाणार येथील प्रस्ताविक ग्रीन रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्यायचा प्रयत्न असून शिवसेनेने यात दुटप्पी भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन विखे पाटील यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोकणातील नाणार प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापले असताना काँग्रेसकडून सेना-भाजपवर प्रहार करण्यात आला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात सेना-भाजपचे नेते ‘ड्रामा’ करत असून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. नाणार येथील प्रस्ताविक ग्रीन रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्यायचा प्रयत्न असून शिवसेनेने यात दुटप्पी भूमिका घेतली आहे, असे प्रतिपादन विखे पाटील यांनी केले.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. नाणार प्रकल्पासंदर्भात विधानसभेत सरकार दावा करते ही हा प्रकल्प राज्यातच होणार, तर दुसऱ्या बाजूला उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई कामकाज थांबवून प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगतात. मंत्री म्हणून सुभाष देसार्इंचे मत हे सरकारचे मत समजले जाते. त्यामुळे या सर्व रस्सीखेचातून हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे स्पष्ट आहे व शिवसेनादेखील त्यात साथ देत आहे, असा दावा विखे पाटील यांनी केला.
सेना-भाजपची युती निश्चित
यावेळी शिवसेना-भाजप यांची युती होणार असल्याचा दावादेखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. एकीकडे शिवसेना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडते. दुसरीकडे एकमेकांच्या हातात हात घालून सत्तेचा लाभ घेतला जातो. मुळात भाजपसोबत जाण्याशिवाय शिवसेनेला पर्याय नसल्यामुळे येत्या निवडणुकात भाजप-शिवसेना यांच्यात युती होणार आहे, असे विखे-पाटील म्हणाले.
शेतकरी नेत्यांमध्ये सरकारने फूट पाडली
कर्जमाफी, शेतकरी समस्या व इतर प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारीच नाही. शेतकरी आंदोलनातदेखील सरकारने फूट पाडली. किसान सभेचे मूळ आंदोलन होते. मात्र ते त्यानंतर भलत्याच लोकांनी ‘टेकओव्हर’ केले. रघुनाथ पाटील यांच्यासारखे लोक शेतकरी आंदोलनात श्रेयवादाच्या लढाईतून पुढे आले, असा आरोप राधाकृष्ण-विखे पाटील यांनी केला.
आघाडीबाबत कार्यकर्त्यांचा जाणून घेतला कल
दरम्यान, राज्यात लोकसभेच्या दोन आणि विधानसभेची एक अशा तीन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. यात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचादेखील समावेश आहे. या पोटनिवडणुकांसाठी त्यांनी भंडारा-गोंदिया येथील पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आघाडीसंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. मात्र कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यासाठी ही बैठक आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.