नागपूर जिल्ह्यातील हिंगण्यात सेनेची भाजपला साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 08:43 PM2022-02-18T20:43:02+5:302022-02-18T20:43:27+5:30
हिंगणा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या लता गौतम (पारधी) तर उपाध्यक्षपदी अजय बुधे यांची निवड झाली आहे.
नागपूर : हिंगणा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या लता गौतम (पारधी) तर उपाध्यक्षपदी अजय बुधे यांची निवड झाली आहे.
शुक्रवारी नगर पंचायत कार्यालयात नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. तीत लता गौतम (पारधी) यांना १२ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशाखा लोणारे यांना ५ मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अजय बुधे यांनाही १२ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दादाराव इटनकर यांना ५ मते मिळाली.
निवडणुकीत भाजपावर सडकून टीका करणाऱ्या शिवसेनेने नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदान केल्याने मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहराच्या विकासासाठी भाजपाला मतदान केल्याचे शिवसेनेचे नगरसेवक विष्णू कोल्हे यांनी मतदानानंतर स्पष्ट केले.
१७ सदस्यीय हिंगणा नगर पंचायतीत भाजपाचे ९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५, अपक्ष (२) तर शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला आहे. दोन अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्याने भाजपाने ११ जणांच्या गटाची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आधीच केली होती. निवडणुकीत सेनेने साथ दिल्याने भाजपाच्या गटाचे संख्याबळ १२ वर पोहोचले. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे आ. समीर मेघे यांनी अभिनंदन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष छाया भोस्कर, सुचिता चामाटे, विशाल चामाटे, बेबी गजबे, माया ढवळे, प्राजक्ता गजबे, जया खाडे, कल्पना वडे, शांताराम मडावी व शिवसेनेचे विष्णू कोल्हे आदी उपस्थित होते.