भंडारा-गोंदियासंदर्भात सेनेचे ‘वेट अॅन्ड वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 08:40 PM2018-05-11T20:40:37+5:302018-05-11T20:40:56+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात शिवसेनेचा पाठिंबा कुणाला राहणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. परंतु सेनेने अद्याप पाठिंब्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नसून पुढील दोन ते तीन दिवस ‘वेट अॅन्ड वॉच’ हीच भूमिका राहणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. विदर्भातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे शुक्रवारी नागपुरात आले होते. यावेळी पत्रपरिषदेच्या माध्यमतून त्यांनी सेनेची भूमिका मांडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात शिवसेनेचा पाठिंबा कुणाला राहणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. परंतु सेनेने अद्याप पाठिंब्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नसून पुढील दोन ते तीन दिवस ‘वेट अॅन्ड वॉच’ हीच भूमिका राहणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. विदर्भातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे शुक्रवारी नागपुरात आले होते. यावेळी पत्रपरिषदेच्या माध्यमतून त्यांनी सेनेची भूमिका मांडली.
पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत राजकारण बाजूला ठेवून येथे चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना सर्व पक्षांनी पाठिंबा देण्याची गरज आहे. पालघरमध्ये आम्ही त्यांना निवडून आणूच. मात्र कोण त्यांना पाठिंबा देत आहे त्याकडेदेखील आमचे लक्ष आहे. त्यानुसारच भंडारा-गोंदियाची भूमिका ठरविण्यात येईल, असे संकेतदेखील उद्धव ठाकरे यांनी दिले.
विदर्भाच्या विकासासाठी रस्त्यावर उतरु, पण...
विदर्भ विकासाच्या विरोधात शिवसेना नाही. त्यामुळे विदर्भाच्या विकासासाठी वेळ पडली तर शिवसेना रस्त्यावर उतरेल. परंतु विकास हवा म्हणून वेगळे राज्य द्या, असे म्हणणे योग्य नाही. विदर्भ हा महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग आहे. विदर्भाला तोडण्याची भाषा करणाºयांवर राजद्रोह दाखल व्हावा ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांची भूमिका एकदम योग्य आहे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले.
‘ईव्हीएम’ प्रणाली हा लोकशाहीचा अपमानच
यावेळी उद्धव ठाकरे यांनी ‘ईव्हीएम’ प्रणालीवर परत टीकास्त्र सोडले. ‘ईव्हीएम’मध्ये आपले मत नेमके कुणाला गेले हे मतदारांना कळतच नाही. हा एकाप्रकारे लोकशाहीचा अपमानच आहे. ‘व्हीव्हीपॅट’ अनिवार्य व्हावे व अशा प्रयत्नांना शिवसेनेचा पाठिंबाच असेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘लोकमत’च्या पुढाकाराचे केले स्वागत
नाणारऐवजी ‘रिफायनरी’ प्रकल्प विदर्भात यावा, यासाठी ‘लोकमत’ने जनप्रतिनिधींना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून या मागणीला मोठे पाठबळ मिळते आहे. हा खरोखरच चांगला पुढाकार आहे. नाणार येथे हा प्रकल्प होणार नाही हे निश्चित. त्यामुळे तो प्रकल्प विदर्भात यायलाच हवा याचा पुनरुच्चारदेखील उद्धव ठाकरे यांनी केला.
तरच पावसाळी अधिवेशन नागपुरात घ्या
पावसाळी अधिवेशन नागपुरात घ्यायला आमचा विरोध नाही. मात्र हे अधिवेशन केवळ दिखाव्यासाठी असता कामा नये. जर राज्य व विशेषत: विदर्भासाठी चांगले निर्णय होणार असतील, तरच पावसाळी अधिवेशन उपराजधानीत घेण्यात यावे, असे स्पष्ट मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
मला सध्या पंतप्रधान व्हायचे नाही
राहुल गांधी यांनी पंतप्रधान होण्यासंदर्भात तयारी असल्याच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांना विचारणा केली असता, ते गांधी यांचे वैयक्तिक मत असून त्यांना ते स्वातंत्र्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. पंतप्रधान होण्याची अनेकांना इच्छा असते. महाराष्ट्रातदेखील अनेकांना ती इच्छा होती. मला तरी सध्या पंतप्रधान व्हायचे नाही असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.