‘गुगल पे’वर १० कोटी पाठवा, नितीन गडकरींना धमकी; बेळगाव तुरुंगात पुन्हा पोहोचला मोबाइल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 05:36 AM2023-03-22T05:36:53+5:302023-03-22T06:32:30+5:30
जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा असे फोन करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
नागपूर : ‘गुगल पे’वर १० कोटी पाठवा आणि पोलिसांना सांगू नका, अशा आशयाचा फोन बेळगावच्या तुरुंगातील कुख्यात आरोपीने दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी सकाळी केला.
जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा असे फोन करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याने यापूर्वी १४ जानेवारी २०२३ रोजी गडकरींच्या कार्यालयात तीन फोन केले होते. त्यावेळी त्याने डी गँगचा सदस्य असल्याचे सांगत १०० कोटींची मागणी केली होती. हा फोन बेळगावच्या तुरुंगातून आल्याचे निष्पन्न झाले होते.
मंगळवारी सकाळी १०.५३ आणि ११.०८ वाजता पुन्हा धमकीचे फोन आले. त्यावरून जयेशने रझिया नावाच्या तरुणीचा मोबाइल क्रमांक देऊन त्यावर गुगल पे द्वारे १० कोटी रूपये मागितले. दाऊद गँगचा सदस्य असल्याचा पुनरुच्चार त्याने केला. लोकेशन तपासले असता बेळगावच्या तुरुंगाचे निघाले. केंद्रीय एजन्सी आणि शहर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेचे निरीक्षण करून गरजेनुसार सुरक्षा वाढविली.
कोण आहे रझिया ?
रझिया ही युवती सामान्य कुटुंबातील आहे. ती इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते. तिचा बॉयफ्रेंड बेळगावच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तिची आणि जयेशची ओळख झाली.
रझियाच्या बॉयफ्रेंडने जयेशच्या मोबाइलवरून तिच्याशी संपर्क साधला. याप्रकारे रझियाचा मोबाइल क्रमांक जयेशकडे आला.