मुलांना शाळेत पाठविता की ऑनलाईनचा पर्याय निवडता? निर्णय पालकांनाच घ्यायचा आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 08:53 PM2021-09-30T20:53:47+5:302021-09-30T20:54:28+5:30

Nagpur News मुलांना ‘शाळेत पाठविता की ऑनलाईनच शिकविता?’, हा निर्णय घेण्याची जबाबदारी शाळांनी पालकांवर साेडली आहे. शाळांनी याबाबतचे पत्र विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठविले आहे.

Send children to school or choose online? The decision rests with the parents | मुलांना शाळेत पाठविता की ऑनलाईनचा पर्याय निवडता? निर्णय पालकांनाच घ्यायचा आहे

मुलांना शाळेत पाठविता की ऑनलाईनचा पर्याय निवडता? निर्णय पालकांनाच घ्यायचा आहे

Next
ठळक मुद्दे शाळेत आल्यास पाळावे लागतील सर्व नियम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात शाळा सुरू करण्याचे निर्देश आले आहेत आणि त्यानुसार शाळा तयारीलाही लागल्या आहेत. मात्र, सुरक्षेची चिंता लक्षात घेत, ‘शाळेत पाठविता की ऑनलाईनच शिकविता?’, हा निर्णय घेण्याची जबाबदारी शाळांनी पालकांवर साेडली आहे. शाळांनी याबाबतचे पत्र विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठविले आहे.

काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आता कमजाेर हाेत असल्याचे दिसत असल्याने राज्य शासनाने ४ ऑक्टाेबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला व तसे निर्देश विविध जिल्ह्यांच्या प्रशासनाला दिले. शाळा सुरू करताना काेराेना प्रतिबंध नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शाळांनीही आता तयारी चालविली आहे. मात्र, काेराेनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून पालकांमध्ये अद्याप भीती असून, मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. मुलांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल करीत पालकांनी चिंता मांडली आहे. यावर शाळांनी एक ताेडगा काढला आहे. नागपूर शहरातील शाळा चालकांनी पालकांसमाेर दाेन्ही पर्याय ठेवले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळा विद्यार्थ्यांची व्यवस्था करतील; पण हायजीनची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांवर राहील, असे शाळांनी स्पष्ट केले. शाळांनी पालकांना पत्र पाठवून शाळेत पाठविणे किंवा ऑनलाईन शिकविणे, यावर निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. दाेन्ही पर्यायांसाठी शाळा तयार असून, निवडण्याची जबाबदारी पालकांवर अवलंबून राहील. पालकांनी तसा फाॅर्म भरून शाळेत सादर करायचा आहे. दरम्यान, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमावली ठरविली असून, त्याचे पत्रकही पालकांना साेपविण्यात आले आहे.

 

शाळेत याल तर हे नियम असतील

- दरराेज कपडे धुवावे लागणार असल्याने गणवेश बंधनकारक राहणार नाही. काेणतेही स्वच्छ कपडे घालून येता येईल.

- शाळेत असेपर्यंत विद्यार्थ्याने मास्क घालणे बंधनकारक असेल.

- मुलांनी घरूनच पुरेसे पिण्याचे पाणी आणावे.

- साेबत सॅनिटायझर ठेवून ते थाेड्या थाेड्या वेळाने वापरावे लागेल.

- पालकांनीच त्यांच्या पाल्यांना वेळेत शाळेत साेडावे लागेल आणि घरीही न्यावे लागेल.

- विद्यार्थ्यांनी वर्गात त्यांच्यासाठी ठरविलेल्या बेंचवरच बसायचे आहे.

 

काय करू नये

- मुलांनी त्यांची जागा साेडू नये.

- विद्यार्थ्यांनी जेवणाचा डबा शाळेत आणू नये. कारण मधली जेवणाची सुटी राहणार नाही.

- विद्यार्थ्याला किंवा घरच्या कुठल्याही सदस्याला आराेग्यविषयक समस्या असेल किंवा आजार असेल तर पालकांनी त्याला शाळेत पाठवू नये.

- पालकांनी शाळेच्या परिसरात प्रवेश करण्यास मनाई असेल.

Web Title: Send children to school or choose online? The decision rests with the parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा