वरिष्ठ वकिलाची मर्सिडीज चोरीला : नागपूरच्या जिल्हा न्यायालय परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:29 AM2019-07-18T00:29:48+5:302019-07-18T00:31:08+5:30
जिल्हा न्यायालयासमोर पार्क असलेली एका ज्येष्ठ वकिलाची मर्सिडीज कार बुधवारी दुपारी चोरीला गेली. पोलिसांनी पाच तासाच्या आत आरोपी युवकास पकडले. त्याच्याजवळून चोरलेली कारही जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा न्यायालयासमोर पार्क असलेली एका ज्येष्ठ वकिलाची मर्सिडीज कार बुधवारी दुपारी चोरीला गेली. पोलिसांनी पाच तासाच्या आत आरोपी युवकास पकडले. त्याच्याजवळून चोरलेली कारही जप्त केली. सुरज गोंडाणे असे आरोपीचे नाव आहे. तो काटोल येथे राहतो. तो एका महिला वकिलाकडे काम करतो. त्याचा एक मित्रही एका वकिलाचा वाहन चालक आहे. त्यामुळे तो जिल्हा न्यायालय परिसरात येत-जात असतो.
धंतोली येथील रहिवासी ज्येष्ठ वकील मुकेश शुक्ला हे आपल्या मर्सिडीज कार (एमएच/४६/एसी/९८१८) ने आपल्या सहायकासह बुधवारी सकाळी ११.३० वाजता जिल्हा न्यायालयात आले. नेहमीप्रमाणे त्यांनी आपली कार आकाशवाणी चौक ते जीपीओ चौक दरम्यानच्या रस्त्यावर पार्क केली. शुक्ला यांच्या सहायकाने कारची चावी जवळच लोकांचे फोेटो काढणाऱ्या दयाराम पोहानी यांच्याकडे दिली. दुपारी २.३० वाजता सूरज हा पोहानी यांच्या स्टॉलजवळ आला. तिथे सूरजचा मित्र अगोदरच बसलेला होता. सूरजला त्याच्या मित्राने शुक्ला यांच्या मर्सिडिजची चावी दिली. पोहानीचे लक्ष जाण्याअगोदरच सूरज कार घेऊन फरार झाला. या घटनेची माहिती होताच अॅड. शुक्ला यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनीही सीताबर्डी पोलिसांना सूरजला शोधण्याचे निर्देश दिले. सूरज कार घेऊन काटोलच्या दिशेने गेल्याची माहिती मिळताच पोलीसही त्याचा पाठलाग करीत काटोलला पोहोचले. सूरजने कार एका ठिकाणी लपवून ठेवली आणि आपल्या गावात जाऊन लपून बसला. पोलिसांनी रात्री ८ वाजता मर्सिडीज कार जप्त करून सूरजला अटक केली. कारमध्ये महत्त्वाचे दस्तावेज ठेवले होते. यामुळे पोलिसांची चिंता आणखी वाढली होती. सीताबर्डी पोलीस रात्री उशिरापर्यंत सूरजची विचारपूस करीत होते.