ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत कुमुद पावडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2023 07:36 PM2023-05-31T19:36:18+5:302023-05-31T19:36:38+5:30
Nagpur News आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, लेखिका, उत्तम वक्ता, सामाजिक कार्यकर्त्या कुमुदताई पावडे यांचे बुधवारी सायंकाळी पाच वाजता निधन झाले.
नागपूर : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, लेखिका, उत्तम वक्ता, सामाजिक कार्यकर्त्या कुमुदताई पावडे यांचे बुधवारी सायंकाळी पाच वाजता निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात ३ मुले आणि एक मुलगी आणि नातवंडं असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी १ जून रोजी त्यांच्या धंतोली येथील राहत्या घरून सकाळी ११ वाजता निघेल. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार केले जातील.
कुमुद पावडे यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९३८ मध्ये झाला. वडील देवाजीराव सोमकुंवर व आई आंबेडकरी चळवळीत सक्रिय असल्याने त्यांच्यावर डाॅ. बाबासाहेबांच्या विचारांचा लहानपणापासून प्रभाव हाेता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ ऑक्टोबर १९५६ रोजीच्या ऐतिहासिक धम्म दीक्षा सोहळ्याच्या त्या साक्षीदार होत्या. ज्या काळात कमालीची अस्पृश्यता पाळली जात होती. तेव्हा त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला होता; संस्कृत शिकणाऱ्या त्या पहिल्या दलितांपैकी होत्या. इतकेच नव्हे तर संस्कृत पंडिता म्हणजेच संस्कृत विद्वान म्हणून त्यांनी मान्यता मिळवली.
त्या शासकीय महाविद्यालय, अमरावती येथील संस्कृत विभागाच्या त्या प्रमुख होत्या. राष्ट्रीय दलित महिला महासंघाच्या त्या संस्थापक सदस्यही होत्या. वयाच्या २१ व्या वर्षापासून रात्रशाळेतून त्यांनी विनावेतन शिक्षणदानाचे कार्य सुरू केले. त्यानंतर नागपूर ते अमरावतीपर्यंत विविध महाविद्यालयांमध्ये त्यांनी शिक्षणदानाचे कार्य केले. ३६ वर्ष शिक्षणाचे कार्य करत शासकीय कला व समाज विज्ञान संस्था येथून त्या निवृत्त झाल्या. त्यांच्या सामाजिक कार्याची यादीही मोठी आहे. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहित करणे व त्याचा प्रचार-प्रचारात त्यांचे मोठे योगदान राहिले. या कार्यादरम्यान त्यांनी स्वत: गांधीवादी कार्यकर्ते मोतीराम पावडे यांच्याशी लग्न झाले. त्या काळात त्यांचे लग्न मोठे गाजले होते. स्त्रीमुक्ती व दलित स्त्रीयांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी आजीवन प्रयत्न केले. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांनी महिलांचे प्रश्न मांडले.
लोकमतनेही केला गौरव
महाराष्ट्र शासनाचा संस्कृत पंडित पुरस्कार, अमेरिकन वूमन्स ऑर्गनायझेशनचा महाराष्ट्र फाउंडेशनचा समाज गौरव पुरस्कार, राष्ट्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार यासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार व सन्मानाने त्यांचा गौरव करण्यात आला. लोकमतनेसुद्धा जीवनगौरव पुरस्कारासह दोन वेळा त्यांचा गौरव केला.