चौकशीसाठी लष्करातील वरिष्ठ दाखल?
By admin | Published: February 28, 2017 02:04 AM2017-02-28T02:04:14+5:302017-02-28T02:04:14+5:30
लष्कराच्या पेपरफूट प्रकरणाने केंद्रातील सुरक्षा यंत्रणेतही खळबळ उडवून दिली आहे.
गुप्तचर यंत्रणेचीही विविध पथके : दिल्ली, मुंबईचीही नजर
नागपूर : लष्कराच्या पेपरफूट प्रकरणाने केंद्रातील सुरक्षा यंत्रणेतही खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर, लष्करातील वरिष्ठ अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणेचीही विविध पथके रविवारी रात्री या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नागपुरात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
तीन वर्षांत तिसऱ्यांदा लष्कराच्या लेखी परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे परीक्षा प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणेवरच संशयाची सुई फिरली आहे. २०१४ मध्ये लेखी परीक्षेचा पेपर फुटल्याची सप्रमाण माहिती हाती आल्यानंतर, तत्कालीन सीबीआय अधीक्षक संदीप तामगाडगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भर परीक्षा केंद्रात छापा घातला होता. या कारवाईमुळे नागपूरपासून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली होती. लष्कराचे ब्रिगेडियर त्यावेळी काही तासातच नागपुरात आले होते. त्यांनी सीबीआयकडून कारवाईचा अहवाल घेतला होता. दरम्यान, प्रदीर्घ चौकशीनंतर सीबीआयने या पेपरफूट प्रकरणाचा सूत्रधार बेलखोडे आणि त्याच्या साथीदारांसोबतच लष्कराचा एक कनिष्ठ अधिकारी आणि हवालदार दर्जाचे दोन कर्मचारी जेरबंद केले होते. त्यांच्याविरुद्ध प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. काही दिवसानंतर जामिनावर बाहेर आलेल्या बेलखोडेने पुन्हा या गंभीर प्रकाराची पुनरावृत्ती सुरूच ठेवली. त्याने रवींद्रकुमारच्या मदतीने २०१६ मध्येही लष्कराच्या लेखी परीक्षेचा पेपर फोडला. त्यातील ९ प्रश्न त्याने उमेदवारांना दिले. हा प्रकार उघडकीस न आल्यामुळे निर्ढावलेल्या बेलखोडेने यावेळी नागपूरच नव्हे तर राज्यासह गोवा (पणजी) आणि गुजरातमध्येही दलालांचे जाळे पसरवून त्यांच्याकडून ठिकठिकाणच्या उमेदवारांना लेखी परीक्षेत गैरप्रकार करण्याचा मार्ग दाखविला. मात्र, ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा भंडाफोड केल्यानंतर ठाणे, पुणे,पणजी, नागपूर आणि अकोल्यात कारवाई झाली. परिणामी देशभरात खळबळ निर्माण झाली आहे. तीन वर्षांत तीनवेळा लष्कराच्या लेखी परीक्षेचा पेपर फुटतो, हा प्रकारच सुरक्षा यंत्रणेला चक्रावून सोडणारा आहे. या प्रकरणात केवळ बेलखोडे-रवींद्रकुमार नव्हे तर परीक्षा प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका वठविणारी मंडळी सहभागी असावी, असा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे लष्कराच्या वरिष्ठांसह आयबीचेही अधिकारी चौकशी करीत आहेत.(प्रतिनिधी)
डीजींची २४ तासात दुसरी भेट
सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली, मुंबईतील वरिष्ठ अधिकारी नागपुरात आले असून, डिसूझा नामक एक वरिष्ठ अधिकारी स्वतंत्रपणे या प्रकरणाचा तपास करीत असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात प्रचंड गोपनीयता बाळगली जात आहे. पोलीस महासंचालक सतीशचंद्र माथूर रविवारी सकाळी मॅराथॉनच्या निमित्ताने नागपुरात आले होते. दुपारी ते नागपुरातून निघून गेल्याचे स्थानिक अधिकारी सांगत होते. मात्र, आज दुपारी महासंचालक माथूर पुन्हा नागपुरात दाखल झाले. २४ तासात पोलीस महासंचालक दुसऱ्यांदा नागपुरात आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी मात्र ते गडचिरोलीतून आल्याचे सांगून याबाबत बोलण्याचे टाळले.