ज्येष्ठ नागरिक वसंत ढोमणे ठरले नागपुरातील पहिले गृह मतदार
By आनंद डेकाटे | Published: April 14, 2024 06:37 PM2024-04-14T18:37:31+5:302024-04-14T18:37:48+5:30
गृह मतदानाला पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघापासून सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील नागरिक तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यात १४ एप्रिलपासून गृह मतदानाला नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून सुरुवात झाली. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातील डायमंडनगर येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक वसंत ढोमणे यांनी सर्वप्रथम आपला गृह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाईत, क्षेत्रीय अधिकारी राजूरकर, केंद्राध्यक्ष मंगला गंगारे, बीएलओ वंदना तृपकाने उपस्थित होते.
८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना मतदानाचा लाभ मिळावा व त्यांनाही मतदान करता यादृष्टीने १४ ते १७ एप्रिल या कालावधीत नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातील एकूण २ हजार ३६० मतदार गृहमतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नागपूरसाठी निवडणूक विभागातर्फे १६० टीम तयार करण्यात आल्या असून यात ४८० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी १०५ टीम तयार करण्यात आल्या असून यात ३१५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कुठल्याही प्रकारे मतदाराच्या मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हा निवडणूक विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.