सायंकाळ होताच वरिष्ठ डॉक्टर होतात गायब : मेयोतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:40 AM2019-08-20T00:40:50+5:302019-08-20T00:42:10+5:30
सायंकाळ होताच वरिष्ठ डॉक्टर रुग्णालयातून गायब होत असल्याने, त्यांचा वचक राहत नसल्याने असे प्रकार रोजच घडत असल्याच्या तक्रारी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नगरसेवकाच्या मुलाला उपचार न मिळाल्याच्या घटनेने मेयोत खळबळ उडाली. दोषी ठरलेल्या तीन ‘कॅज्युल्टी मेडिकल ऑफिसर’ची (सीएमओ) सेवा समाप्त करण्यात आली, तर चार निवासी डॉक्टर, तीन नर्सेस व एका ब्रदरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्यानंतरही रुग्णालयाचा कारभार सुधारण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. सायंकाळ होताच वरिष्ठ डॉक्टर रुग्णालयातून गायब होत असल्याने, त्यांचा वचक राहत नसल्याने असे प्रकार रोजच घडत असल्याच्या तक्रारी आहेत.
गरीब, मध्यमवर्गीयांच्या घरात कुणी आजारी पडून त्याला रु ग्णालयात दाखल करायची वेळ आली तर मोठे संकट कोसळल्याप्रमाणे स्थिती होते. सरकारी रुग्णालयात नेल्यास रुग्ण जीवानिशी जाण्याची भीती असल्याने अनेक जण पदरमोड करून खासगी इस्पितळात जातात. परंतु येथे आपली लूट होत आहे, हे समजाच पुन्हा शासकीय रुग्णालयाकडे वळतात. परिणामी, मागील तीन वर्षांत मेयोमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या दोन हजारावरून तीन हजारावर गेली आहे, तर आंतररुग्ण विभागातही रुग्णांची संख्या वाढल्याने बहुसंख्य वॉर्डांच्या खाटा फुल्ल राहत आहेत. मात्र, नियोजन नसल्याने रुग्णसेवा ढासळत चालली आहे. गेल्याच आठवड्यात एका वरिष्ठ नगरसेवकाला अशा प्रसंगातून जावे लागले. या घटनेला गंभीरतेने घेत प्रशासनाने प्रथमच दोषींवर कारवाई केली. परंतु परिस्थीती आजही सुधारलेली नाही. यामागील कारण म्हणजे वरिष्ठ डॉक्टरांचा वचक राहिला नसल्याचे बोलले जात आहे. रुग्णालयात औषधवैद्यकशास्त्र विभाग (मेडिसीन), शल्यचिकित्सा विभाग (सर्जरी), बालरोग विभाग व अस्थिव्यंगोपचार विभागाशी संबंधित रुग्णांची संख्या मोठी असताना, सायंकाळी ६ नंतर सहायक प्राध्यापकांपासून ते इतरही वरिष्ठ डॉक्टर रुग्णालयात राहत नाही. विशेष म्हणजे, दर दिवशी ठरलेल्या ‘युनिट’नुसार वरिष्ठ डॉक्टरांची ड्युटी लावली जाते. यामुळे रात्रीच्या वेळी रुग्णालयात त्यांनी हजर असणे आवश्यक आहे. परंतु ते ‘ऑनकॉल’ म्हणजे केवळ फोनवरच उपलब्ध असतात. वरिष्ठच आपली जबाबदारी सांभाळत नसल्याने कनिष्ठ डॉक्टरांचा मनमानीपणाचा फटका गरीब रुग्णांना सहन करावा लागत आहे. काही निवासी डॉक्टर तर स्वत:ला वरिष्ठ समजून सेवा देतात. त्यांच्याकडे अनुभव व कौशल्य कमी असल्याने, अनेकदा उपचाराला घेऊन त्यांचे आणि रुग्णांच्या
नातेवाईकांचे खटके उडतात. हा प्रकार कधी थांबणार, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.